पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नृत्य, गीताचे शिक्षण, व्यायाम, तेलहळदीची उटी अशा अनेक बाबींनी या स्त्रियांचे जीवन बांधलेले असे. पंधराव्या वर्षाच्या सुमारास या मुली धंद्याला लावल्या जात. फार तर पुढचे तारुण्याचे १५-२० वर्षांचे जीवन. यानंतरचे जीवन भेसूर असते. तारुण्यात स्वतःची कमाई आणि उतारवयात मुलीची कमाई, पण रोगग्रस्तता नाही असे जीवन वाट्याला येणे म्हणजे भाग्यच. फार थोड्या स्त्रियांच्या वाट्याला हे जीवन येत असे.
गणिका- राजाच्या दासी
 कोणत्याही राज्यातील सर्व गणिका राजाच्या दासी मानल्या जात. त्या केव्हाही राजाच्या भोगासाठी उपलब्ध होत्या. त्यांच्यातूनच राजनर्तिका, गायिका, नट्या यांची निवड होई, पण त्याखेरीज राजाची सेवा करणाऱ्या निरनिराळ्या परिचारिकांची सुद्धा निवड होई. तारुण्य उतारात पडल्यावर या स्त्रियांना दासी, दाई, स्वयंपाकिनी, सूतकाम यावर नेमले जाई. राजवाड्यातील रसोईघर उतारात पडलेल्या गणिकांनी भरलेले असे. राजाचा सर्व गणिकांच्यावर अधिकारच असल्यामुळे कोणत्याही नाटकात राजा आणि गणिका यांची प्रीती दाखवलेली नसते. एक तर अशी प्रीती दाखवणे राजाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही. समाजाला हे चित्र गर्हणीय वाटणार, निदान वाटावे अशी अपेक्षा आहे. दुसरे म्हणजे गणिका इच्छा करताच व इच्छा असेल तोवर राजाची असते. अनुनय, मन जिंकणे, रुसणे, रुसवा काढणे या क्रिया तिथे संभवत नाहीत.
 राजा, राजाचे नातेवाईक, सरदार यांच्या आश्रयाखाली जाण्याची धडपड हा गणिकांचा एक कायम उद्योग असे. इतरांच्या आक्रमणापासून रक्षण, खूप कमाई व जीवनाला स्थैर्य या जागीरदारांच्या आश्रयामुळे येई. शिवाय असा आश्रय प्रतिष्ठितपणाचा मानला जाई. त्याखालोखाल महत्त्व एखाद्या श्रीमंताच्याकडे स्थिरावण्याला असे. या दोन्ही गोष्टी जमल्या नाहीत तर येईल त्या श्रीमंताची सेवा हा गौणपक्ष असे. येणाऱ्या-जाणाऱ्या गिहाइकांनी हजार-पाचशे रुपये रात्रीच्यासाठी देणे हे सुद्धा दूरदृष्टीने पाहणाऱ्यांना गौण वाटे आणि त्या वेळच्या समाजात याला मोठा अर्थ होता. कायमची एखाद्या सरदाराची, जमीनदाराची अगर व्यापाऱ्याची असणे सुखाचे व सुरक्षिततेचे असे. कारण अशा रक्षित स्त्रीला जे मिळेल ते उत्पन्न बचत ठेवता येई आणि जे बचतधन असेल ते कुणी लुटील

२६२ / रंगविमर्श