पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून आणून सोडलेल्या स्त्रियांच्या पासून पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्यापर्यंत अनेकजण होते. तरुण देखण्या स्त्रिया नृत्य-गायन-नाट्य या क्षेत्रांत असत. या तरुण व कलावती स्त्रियांना मागणी जास्त असे. त्यांचे उत्पन्नही जास्त असे. त्यांच्या घरी त्यांचा एक मोठा नोकरपरिवार व सेवकवर्ग असे. गणिका म्हणून प्रतिष्ठेने ज्यांचा उल्लेख केला जातो तो हा वर्ग आहे. ज्या तरुण आणि देखण्या आहेत, पण ज्यांच्या अंगी इतर कोणतीही कला नाही त्यांची प्राप्ती त्या मानाने कमी असे. रूपाजीवा म्हणून त्या ओळखल्या जात. फार मोठा वर्ग अशा स्त्रियांचा असे. ज्यांच्याजवळ फारशी कलाही नव्हती, फारसे सौंदर्य नव्हते, पण शरीरविक्रय हाच ज्यांचा व्यवसाय होता त्या सामान्य स्त्रिया. ऐपतीनुसार घरी नोकरचाकर असत, तेही हा व्यवसाय करीत. तारुण्य उतारात पडलेल्या स्त्रिया आपल्या मुलींना व्यवसायात पुढे आणण्याचा प्रयत्न करीत. ज्यांना तारुण्यातही फारशी कमाई झाली नाही त्या स्त्रिया उतारवयात कुणाला तरी गाठून त्याच्यासह राहत. या वेश वस्तीच्या शेजारी दरिद्री व कमी पैशात जगणाऱ्या पताका वेश्यांची वस्ती असे.
 वेश हा असा विविध वयाच्या आणि विविध उत्पन्न असणाऱ्या गणिकांचा समूह होता. या समूहात सर्व जीवन वैभवात आणि निरामय काढणे हा योग फार थोड्या जणींच्या नशिबी होता. तारुण्यात बऱ्यापैकी कमाई आणि रोगग्रस्त दारिद्र्यात हालअपेष्टांत मरण हाच बहुतेकजणींचा योग असे. पायांशी लोळणारी संपत्ती व शब्दांवर झुलणारे सरदार व व्यापारी असा वैभवशाली आरंभ असणारी वासवदत्ता ही रोगग्रस्त होऊन सड़केच्या गाठी दीन होऊन पडते व भगवान उपगुप्त तिला आसरा देतात, तारतात ही कहाणी आपण नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. वास्तवाचे हे चित्र आपणास माहीत असले म्हणजे स्वप्न आणि सत्य यातील अंतर ओळखणे जड जात नाही.
 दशकुमार-चरिताचा लेखक दंडी आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथांचा विचार करताना असे दिसते की, गणिकेला बालपण जवळजवळ नसेच. नाटके व भाण पाहिले म्हणजे असे वाटते की, जीवनाचा फार मोठा भाग स्त्रियांच्या बाबतीत हसण्या-खेळण्याचा असे. हे वाटणे खोटे आहे. पाचव्या-सहाव्या वर्षापासूनच धंद्याच्या दृष्टीने या मुलींची तयारी केली जात असे. त्या फार रोड नसाव्यात, फार स्थूल नसाव्यात. देखण्या दिसाव्यात, गोऱ्या दिसाव्यात म्हणून

चतुर्भाणी बावनखणी । २६१