पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवेचक असे आहेत की त्यांना मृच्छकटिकातील वास्तववाद अतिशय मोहक वाटतो. संस्कृत नाटकाच्या मध्ये आपण ज्याला वास्तववाद म्हणतो तो नसतो. आपण बाल्झाक वाचताना वास्तववादाबाबत जी समजूत मनाशी दृढ धरून असतो ती निराळी. समोर असणारा समाज शक्य तो जसाच्या तसा वाङ्मयातून साकार करणे ही प्रवृत्ती प्राचीन जगातच दुर्मिळ आहे. वेगवेगळ्या प्रकारचा स्वप्नविलास हीच या वाङ्मयाची वास्तवता आहे. अतिशयोक्तीची भर घालून वास्तवाच्यापैकी जो रोचकभाग तेवढाच सांगायचा हा स्वप्नरंजनाचाच एक भाग आहे. हे स्वप्नरंजन मृच्छकटिकातही आहे. भाणांच्यामध्ये आहे. 'नाटक' या नावाने प्राचीन भारतात जे नाटक ओळखले जाई (उदा. 'शाकुंतल', 'उत्तररामचरित' इ.) त्यापेक्षा 'प्रकरण' या नावाने जे नाटक ओळखले जाई (उदा. मालतीमाधव, प्रतिज्ञायौगंधरायण, मृच्छकटिक) त्यात वास्तवाची ओळख तुलनेने अधिक दिसे. भाणांच्यामध्येही सारे स्वप्नरंजन आहेच, पण संस्कृत नाट्यसृष्टीत आपण 'भाण' पाहताना वास्तवाच्या जितके जवळ असतो, तितके इतर नाटकप्रकार पाहताना नसतो.
 प्राचीन भारतीय समाज हा विषम समाजरचनेने भरलेला समाज आहे. या विषम समाजरचनेत एक तर वर्णनिहाय विषमता आहे. दुसरे म्हणजे परंपरागत मोठेपणाच्याही काही बाबी आहेत. राजे, सरदार, व्यापारी आणि त्यांचे परोहित मिळून म्हणजे ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या तीन गटांचे मिळून सुमारे १५ टक्के लोकांच्या वैभवाचे हे जग आहे. या जगात उरलेल्या ८५ टक्के लोकांना प्रतिष्ठा नाही, तसे वैभवही नाही. आज विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपण उभे आहोत. आजही भारताचा तीन चतुर्थांश भाग ग्रामीण आहे. जुन्या काळी औद्योगिक संस्कृतीच्या उदयापूर्वी मोठी शहरे आजच्यापेक्षाही कमी होती. जंगलातून राहणारे अदिवासी आजच्यापेक्षा अधिक. छोट्या छोट्या वस्त्यांची खेडीही आजच्या मानाने अधिक. जंगले अधिक लोकसंख्या आजच्यापेक्षा फार कमी. शहरांची संख्या फार मोजकी. म्हणून ज्या गुप्त काळातील हे भाण आहेत त्या काळी भारताची लोकसंख्या ६-७ कोटींच्या आसपास आहे. नागरी लोकसंख्या जास्तीत जास्त १५ टक्के असणार. ८५ टक्के भारत हा त्या काळी प्रामुख्याने शेती व संलग्न व्यवसाय करणाऱ्या शूद्रांचा व आदिवासींच्या समूहांचा बनलेला आहे. ज्या वैभवशाली नागरी संस्कृतीचे दर्शन आपण या

चतुर्भाणी बावनखणी / २५९