पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमुख रस
 भाणाचा प्रमुख रस कोणता याचा निर्देश नाट्यशास्त्रात नाही. दशरूपकार धनंजय हा दहाव्या शतकातील लेखक. त्याने भाणांच्यामध्ये शृंगार व वीर असे दोन रस असतात हे मत दिले आहे. अभिनवगुप्तांनी भाणांच्यामध्ये करुण व अद्भुत असतो असा उल्लेख केला आहे. आपण जर या उल्लेखांच्यामुळे भाणाचे रूप दर शतकात बदलत येत होते असे मानले तर ती चूक ठरेल. नाट्यशास्त्राच्या समोर भाणाचे जे रूप होते तेच प्रायः राहिले आहे. मतभेद असेल तर या रूपाचे वर्णन करावयाचे कसे या मुद्द्यावर आहे. विट मधूनमधून स्वतः केलेल्या मारामाऱ्यांचे वर्णन करणार, इतरांच्या माऱ्यामाऱ्यांचे वर्णन करणार, म्हणन भाणात वीररस मानायचा. मधनमधन फसवणाऱ्या गणिका व फसवणारी गिहाइके यांच्याही कथा येणार म्हणून तिथे करुणरसही मानायचा. परस्परांशी भांडलेली मंडळी अनपेक्षितपणे एकत्र येणार म्हणून अद्भूतही तिथे आहे. तसे पाहिले तर भाणाच्या मध्ये बीभत्सरसही कधीकधी येतो असे इतर कुणी न म्हटले तर आपण म्हणू शकतो. याच संग्रहातील चौथ्या भाणाच्या पृ. २२ वर बीभत्साचा उल्लेख आहे. भाणातील रसांच्या या याद्या खरे म्हणजे निरर्थक आहेत. भाणाच्यामधील मुख्य रस एकच आणि तो म्हणजे शृंगार. हा शृंगार खुलविण्यासाठी छटा व पूरक म्हणून इतर कोणत्याही रसाची सावली भाणात वर्ण्य नाही. वीर, करुण आदी सारे रस भाणांच्यामध्ये केवळ मुख्य शृंगाराची चव अधिक रोचक करण्यापुरते असतात. विट हे एकमेव पात्र भाणात आहे असे म्हटल्यावर शृंगार हा प्रधान सर्वव्यापी रस असणार हे उघडच आहे.
वेश ही संकल्पना
 हे भाण व्यवस्थितपणे समजून घ्यावयाचे असतील तर प्राचीन भारतीय समाजरचनेतील 'वेश' ही कल्पना नीटपणे समजून घेतली पाहिजे, ही पहिली बाब आहे. या कल्पनेच्या पोटातच विट ही कल्पना समाविष्ट होते आणि दुसरी बाब म्हणजे 'शृंगार' 'वास्तववाद' या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. वासुदेवशरण अग्रवाल, डॉ. मोतीचंद्र सालेटोर, चकलादार इत्यादी प्राचीन भारतीय समाजाचे वर्णन करणारे जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी माझा फार मोठा मतभेद आहे. वाङ्मयाचा अभ्यास करणारे अनेक रसिक

२५८/ रंगविमर्श