पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण असे मानतो की प्रत्येक प्रवेश हा एका स्थळाला बांधलेला आहे. एका प्रवेशाचे एक स्थळ आणि एकप्रवेशी अंक असेल तर मग प्रवेश एक म्हणून सर्व अंकाचे स्थळ एक. माणसे जातात-येतात, स्थळ बदलत नाही. प्राचीन भारतीय रंगभूमी अशी नाही. प्राचीन भारतीय रंगभूमीचा एक संकेत असा की, नटाने परिक्रमा करावयाची, म्हणजे फिरावयाचे. परिक्रमेने स्थळ बदलते. 'हे माझे घर, चला, आता बाजारात जाऊ' असे म्हणून रंगभूमीवर फिरायचे. 'हा पहा आला बाजार' असे म्हटले की बाजार आला. यामुळे भाण ही एक प्रकृती आहे, एकांकिका आहे, पण स्थळ क्रमाने बदलत जाते. एका स्थळी नाटकीय व्यक्ती उभ्या करायच्या आणि नाना निमित्ते निर्माण करून इतर व्यक्तींना या स्थळी आणायचे, यापेक्षा रंगभूमीवरील स्थळच क्रमाने बदलावयाचे ही पद्धत अशा प्रयोगांना अधिक सोयीची आहे. भारतीय लोकरंगभूमीवर परिक्रमेने स्थळ बदलते हा नाट्यधर्मी संकेत सर्वमान्य आहे. साधले लघुकथा सांगितल्याप्रमाणे भाणांचा हा भावानुवाद सादर करीत आहेत. मुळात ते नाटक आहे. हे नाटक एकांकी असून इतक्या स्थळी कसे फिरते असे विचारायचे नाही. तो भारतीय परंपरेचा संकेत आहे.
आकाशपुरुषाशी संभाषण
 भाणांच्यामध्ये सर्वत्र आकाशपुरुष व त्यांच्याशी संभाषण आहे. हे आकाशपुरुष म्हणजे आकाशातील कुणी देवदेवता नाहीत. समोर न दिसणारा माणूस आहे असे गृहित धरून बोलायचे. तो माणूस काय बोलतो ते आपणच बोलायचे. ही समोर नसणारी व्यक्ती गृहित धरून बोलणे म्हणजेच आकाशपुरुषाचे अस्तित्व मानायचे. नाट्यशास्त्राच्या मते भाणाची वृत्ती भारती आहे. म्हणजे हा नाट्यप्रयोग संपूर्णतः शब्दांच्या आधारे चालणारा आहे. विट हे एक पात्र समोर आहे. यामुळे वेगवेगळ्या पात्रांचा अभिनय भाणात दिसणार नाही. गीत-नृत्यांची रेलचेल नाही. शब्दांची फेक हाच भाणांचा प्रमुख आधार. या शब्दप्राधान्याला भारतीवृत्ती असे म्हणायचे. भाणांच्यामध्ये नाट्य कथानकरचनेतील मुख व निबर्हण असे दोनच संधी असतात. फार मोठे कथानक नाही म्हणून संधीची संख्याही मर्यादित आणि किमान इतकीच आहे.

रं....१७
चतुर्भाणी बावनखणी / २५७