पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकार. या प्रकारातील नाट्यशास्त्रापूर्वीचे अगर नंतरच्या वैभवकाळातले सर्व भाण आज लुप्त आहेत. या गटातील उपलब्ध भाण सर्व उत्तर कालातले आणि सामान्य दर्जाचे आहेत, ही एक फार मोठी हानी मानली पाहिजे. भाणांचा दुसरा प्रकार हा की ज्यात इतरांची कहाणी सांगितली जाते. या दुसऱ्या प्रकारात मोडणारे भाण इ. स.च्या पहिल्या आठशे वर्षांत लिहिले गेले असतील. त्यांपैकी निदान शंभर भाण तरी अव्वल दर्जाचे असतील. शतकाला बारा-तेरा कलाकृती श्रेष्ठ दर्जाच्या असाव्यात, हे काही अतिशयोक्तीचे गणित नव्हे; पण आज या प्राचीन भाणांच्यापैकी फक्त चार उपलब्ध आहेत. ज्या भाणांनी या वाङ्मयप्रकाराला प्रथम प्रतिष्ठा मिळवून दिली व ज्या कलाकृतींच्यामुळे हा नाट्यप्रकार शास्त्राने मान्यता द्यावी इतका वजनदार ठरला त्या लुप्त आहेत. उपलब्ध भाण नाट्यशास्त्रानंतरचे आहेत. घोर हानीतून एवढे तरी हाती उरले हेच आपले भाग्य म्हणावयाचे. एखादा धर्मपिसाट नालंदा विद्यापीठ जाळतो व लाखो ग्रंथ नष्ट होतात, हे खरे आहे; पण शेकडो वर्षांची सर्वांचीच अनास्था ज्या लाखो ग्रंथांची माती करते त्या हानीचा दोष आपणच आपल्या माथ्यावर घेतला पाहिजे.
धूर्त विट संवाद
 नाट्यशास्त्राने भाणांचे वर्णन करताना त्यात एक प्रकृती असते ती धूर्त अगर विट असते असा उल्लेख केलेला आहे. प्राचीन व अर्वाचीन भाणांच्यामध्ये रंगभूमीवर असणारी व्यक्ती विट हीच आहे. सामान्य व्यवहारात धूर्त याचा अर्थ वेगळा होतो; पण या संदर्भात धूर्त हा विटाचा पर्यायच मानला पाहिजे. याच संग्रहातील 'चांदणी चौकातली ती चांगली' या नावाने ज्या भाणाचा अनुवाद आहे तो या दृष्टीने पाहण्याजोगा आहे. मुळात या भाणाचे नाव 'धूर्त विट संवाद' आहे. या भाणातील विश्वलक हा धूर्त म्हणायचा, पण या धूर्ताचे वर्णन जर नीट वाचले तर तेही एका विटाचेच वर्णन आहे हे चटकन पटेल. म्हणून भाणांच्या संदर्भात विट व धूर्त हे दोन्ही परस्परपर्याय मानले पाहिजेत. सर्व भाण एकांकी आहेत. रंगभूमीवर एकच व्यक्ती असणार. या व्यक्तीने बहुचेष्टा व अनेक अभिनय केले तरी त्याला मर्यादा आहेत.
 भाणांचे बहुतेक प्रयोग तासाभरात आटोपणारे आहेत. आधुनिक काळात

२५६ / रंगविमर्श