पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैभवकाळात लिहिले गेलेले असे हे भाण आहेत. वैभवशाली संस्कृत काव्य नाटकांच्या मध्ये जो भाषेचा जिवंतपणा दिसतो त्या गटात आपल्या स्वतंत्र तेजाने दीप्तिमान झालेली अशी भाणांची संस्कृती आहे. हे चार भाण प्राचीन भाण म्हणून ओळखले जातात. या प्राचीन भाणांमध्ये विट प्रायः इतरांची कहाणी सांगताना दिसतात.
भाण- कालचर्चा
 भाण हा अतिशय प्राचीन व मान्यताप्राप्त असा नाट्यप्रकार आहे. भरताचे नाट्यशास्त्र केव्हा निर्माण झाले याबाबत विद्वानांच्यामध्ये मतभेद आहेत. बहुसंख्य विद्वान पॉन रेनॉऊला अनुसरून इ. स. पू. २०० ते इ. स. २०० हा नाट्यशास्त्राचा काळ मानतात. मी इ. स. चे तिसरे शतक हा काळ नाट्यशास्त्राच्या बाबत अधिक प्रशस्त मानतो, पण इ. स. चे तिसरे शतक म्हटले तरीसुद्धा उपलब्ध प्राचीन भाणांच्यापेक्षा आपण दोनशे वर्षे मागे व गुप्त साम्राज्याच्या उदयापूर्वीच्या काळात वावरतो आहो आणि नाट्यशास्त्रात संग्रहित झालेली माहितीसुद्धा परंपरेने संग्रहित झालेली आहे. नाट्यशास्त्रात जेवढे नाट्यप्रकार उल्लेखिलेले आहेत तेवढेच त्या काळी उपलब्ध नव्हते. नाट्यशास्त्राने नोंद न घेतलेले पण त्या काळी उपलब्ध असणारे नाट्यप्रकार इतर पुराव्यांच्या आधारे नोंदविता येतात. 'सट्टक' हा असा प्राचीन नाट्यप्रकार आहे. काही नाट्यप्रकार उपरूपक प्रकार म्हणून पुढच्या मंडळींनी नोंदविले, पण ते प्रकार आहेत मात्र प्राचीन. भरताचे नाट्यशास्त्र नाटकांचे दहा प्रकार नोंदविते. याचा अर्थ हे दहा प्रकारच त्या काळी उपलब्ध होते असा करावयाचा नाही. दहा नाटकप्रकार इ. स. च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात प्रतिष्ठित व शास्त्रमान्य होते, असा याचा अर्थ आहे. भाण जर नाट्यशास्त्रात प्रतिष्ठित असतील तर इ. स.च्या आरंभापासन भाण हा नाट्यप्रकार अस्तित्वात आहे असे म्हणण्यास हरकत नसावी.
उपलब्ध भाण
 सुमारे दोन हजार वर्षांची भाणांची ही परंपरा आहे. नाट्यशास्त्राच्या विसाव्या अध्यायात दहा रूपकप्रकारांचे वर्णन आलेले आहे. या अध्यायात तीन श्लोकांत भाणांचे वर्णन येते. नाट्यशास्त्राने असे म्हटले आहे की भाण दोन प्रकारचे असतात. स्वतःचे वर्णन करणारे, स्वतःची कहाणी सांगणारे भाण हा एक

चतुर्भाणी बावनखणी / २५५