पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वांच्यावर एक उपकाराचे ओझे लादले. भाणाचे सर्व अभ्यासक रामकृष्ण कवींचे कर्जदार आहेत.
चार भाणांचा अभ्यास
 या चारही भाणांचा अतिशय रेखीव आणि मर्मग्राही असा अभ्यास कै. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल व डॉ. मोतीचंद्र यांनी 'शृंगारहाट' ह्या हिंदी ग्रंथांच्या रूपाने समोर ठेवलेला आहे. हा ग्रंथ इ. स. १९६० सालचा आहे. वासुदेवशरण अग्रवाल यांची विवेचक प्रस्तावना आणि डॉ. मोतीचंद्रांचा खास बनारसी ढंगाच्या हिंदीतील अनुवाद व टीपा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. सामान्य वाचकांनी आनंद साधले यांच्या भावानुवादावर तृप्त व्हावे पण खोलात शिरण्याची जिज्ञासा असणाऱ्यांनी शृंगारहाटाकडे वळावे. ह्या ग्रंथात रमणाऱ्यांना हा अनुवाद थोडा मचूळ वाटणारच. डॉ. मोतीचंद्र यांची बरोबरी साधले यांना करता येणार नाही असे म्हटल्यामुळे साधले हेही रागावणार नाहीत. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांत डॉ. प. कृ. गोड, डॉ. मोतीचंद्र आणि डॉ. अग्रवाल हे आपापल्या गटातील दिग्गज आहेत. वाङ्मयाचा सांस्कृतिक अभ्यास कसा करावा याचे जे आदर्श वासुदेवशरण अग्रवाल यांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत ते खरोखरच थक्क करणारे आहेत. मराठीत या तोलामोलाची वाङ्मयाचा सांस्कृतिक अभ्यास करणारी ग्रंथसंपदा नाही. मराठीचा वृथा अभिमान बाजूला ठेवून हे आपण मान्य केले पाहिजे. ज्ञानाच्या क्षेत्रांत खोटे अभिमान उपयोगी ठरणारे नाहीत.
 कवींनी उजेडात आणलेले हे चारही भाण इ. स. च्या पाचव्या शतकाच्या अखेरीस लिहिले गेलेले आहेत. डॉ. थॉमस यांनी या भाणांचा काळ इ. स. चे सातवे शतक असा ठरविलेला आहे. इ. स. चे सातवे शतक म्हटले तरी तो काळ संस्कृत काव्यनाटकांच्या वैभवाचाच काळ आहे. कनोजच्या वैभवाचा, बाणभट्ट आणि श्री हर्षाचा असा हा काळ भवभूतीच्या पूर्वीचा असा हा काळ आहे, पण भाणांच्यामधील वैभवशाली नगरे पाटलीपुत्र व उज्जैन आहेत. मला डॉ. थॉमस यांच्यापेक्षा कै. अग्रवाल यांची भूमिकाच पुराव्याशी अधिक सुसंगत वाटते. मलाही असे वाटते की, हे भाण गुप्तकाळातील आहेत. विक्रमादित्याच्या नंतर, पण नजीकच्या काळात गुप्त साम्राज्य वैभवात असताना, संस्कृत वाङ्मयाच्या

२५४ / रंगविमर्श