पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दहा प्रकार मानण्यात येत हे माहीतच होते. दशरूपक प्रकार, त्यांची नावे आणि वैशिष्ट्ये यांचा परिचय सर्वांना होता, पण इंग्रजी अमदानीत संस्कृत ललित साहित्याचा जो अभ्यास सुरू झाला त्यात काव्य आणि नाटके यांनीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मृच्छकटिकाकडेसुद्धा सर्वांनी प्रायः नाटक म्हणूनच पाहिले. या वाङ्मयाच्या वैभवशाली दर्शनामुळे इतर वाङ्मयाकडे थोडेसे दुर्लक्षच झाले. प्रथमतः जे भाण क्रमाक्रमाने उपलब्ध झाले त्यांची संख्या ११ च्या आसपास आहे. हे उत्तरकाळातील भाग मानले जातात. यांपैकी एक तेराव्या शतकातील, एक चौदाव्या शतकातील आणि इतर त्याही नंतरचे म्हणजे सतराव्या शतकापर्यंतचे आहेत. या उत्तरकालीन भाणांचेही प्रयोग झाले, पण यांना फारशी लोकप्रियता अगर मान्यता मिळालेली दिसत नाही.
 इ. स. १००० नंतर संस्कृत वाङ्मयाचा प्रचंड वेगाने हास होतो. देशी भाषांच्यामधील वाङ्मय वैभवाने बहरू लागले. भक्तिमार्गही नवीन फुलोरा आल्याप्रमाणे डौलात दिसत होता. या कालखंडात शेजारी संस्कृतमध्ये जे भाण लिहिले गेले त्यांचे स्वरूप सांकेतिक आणि थोडे उत्तान असेच होते. वाङ्मय म्हणून हे भाण बरेच सामान्य दर्जाचे आहे. सामान्य प्रतीच्या या वाङ्मयाचे फारसे कौतुक कुणाला न वाटले तर ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे. या उत्तरकालीन भाणांमध्ये विट स्वतःची कहाणी सांगत असतो. ही कहाणीसुद्धा सांकेतिकच असते.
एम. रामकृष्ण  विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात एम. रामकृष्ण कवी या नावाचे एक विलक्षण संस्कृत वाङ्मयाचे संशोधक होऊन गेले. लुप्त असणारे अनेक महत्त्वाचे संस्कृत ग्रंथ या कवींच्या हाती लागत गेले. विवेचक विद्वान म्हणून कवींची फारशी ख्याती नाही, पण सर्व भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांनी कायम त्यांच्या ऋणात राहावे, असे कार्य त्यांनी केले. भरत नाट्यशास्त्राची प्रसिद्धी अभिनवभारती टीका रामकृष्ण कवींनीच उजेडात आणली. त्यांनीच प्राचीन चार भाण उजेडात आणले व चतुर्भाणी या नावाने प्रकाशित केले. वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले हे चार भाण. प्रत्येकाची नावे निराळी. चतुर्भाणी हे त्यांना एकत्र करणाच्या संकलनकाराने दिलेले नाव. कवीने हे मूल्यवान धन इ. स. १९२२ साली उजेडात आणले आणि

चतुर्भाणी बावन्नखणी / २५३