पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझा दहा वर्षे शिळा असणारा अनुवाद 'पायवाट' या संग्रहात आहे. साधले यांचा अनुवाद या संग्रहात आहे. संस्कृत काव्य - नाटकांचा मराठी सैल भावानुवाद करण्याच्या उद्योगात माझे मित्र आनंद साधले गेली कित्येक वर्षे आहेत. साधले यांनी त्यांचा स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केलेला आहे. गेली दहा वर्षे मी मधूनमधून भाणांच्या मराठी अनुवादाची साधल्यांना आठवण देत होतो. शेवटी हा सैल भावानुवाद प्रकाशित होत आहे. साधले यांची शृंगारानुकूल वृत्ती व रसाळ भाषाशैली दोन्हींचेही नमुने वाचकांना या अनुवादात सापडतील.
एकपात्री प्रयोग  दिवाकरांची नाट्यछटा हा एकपात्री प्रयोग आहे. समोर नाट्यांतर्गत एकच व्यक्ती असते. प्राचीन संस्कृत परंपरेप्रमाणे ही एक प्रकृतिरचना आहे. इतर पात्रे गृहित धरावयाची. अलीकडे सुहासिनी मुळगावकर, पु. ल. देशपांडे आणि रंगनाथ कुलकर्णी, लक्ष्मण देशपांडे इ. मंडळींनी एकपात्री प्रयोगांना एक मान्यता व आकर्षण प्राप्त करून दिलेले आहे. आता एकपात्री नाट्यप्रयोग आपल्या अंगवळणी पडला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी ही अवस्था नव्हती. एकपात्री प्रयोगांना असणारे नाट्यमूल्य, त्यांची रंजकता, त्यांचे प्रयोगमूल्य आपण विसरूनच गेलो होतो. इ. स.च्या सतराव्या शतकानंतर जवळ असणाऱ्या अनेक बाबींच्या आठवणी आपण विसरलो. अनेक भरजरी पैठण्या आणि मखमलीची ठाणे आपण विसरलो. त्यांपैकी एक भाण होय.
शृंगारहाट  विसाव्या शतकातील मराठी वाचकांना तर भाणांच्या बाबतीत पुष्कळच बाबी नव्याने सांगणे भाग आहे. त्याविना भाणांचे अनुवादही समोर असले तरी सगळेच त्यामुळे चटकन कळेल असे नाही. म्हणून अगदी प्राथमिक अशा काही बाबी इथे नोंदविण्याचा माझा विचार आहे. अर्थातच या नोंदी विद्वान अभ्यासकांच्यासाठी नाहीत. त्यांनी 'शृंगारहाट' हा आपल्या अभ्यासाचा आरंभ मानला पाहिजे. माझा प्रयत्न सर्वसामान्य रसिकांच्यासाठी आहे.
नाटकाचे दहा प्रकार भारतीय साहित्यशास्त्राच्या सर्व अभ्यासकांना प्राचीन काळापासून नाटकाचे

२५२ / रंगविमर्श