पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १५ वे चतुर्भाणी बावनखणी भरत नाट्यशास्त्राचा माझा अभ्यास अधूनमधून चालू असतो. हा अभ्यास करताना एक दिवस अनपेक्षितपणे एक गोष्ट माझ्या ध्यानी आली. यापूर्वी इतर कोणाच्या ध्यानी ती आली नसेल असे नाही, पण जर ती आली असेल तर त्यावर कुणी लिहिले नाही. नाट्यछटाकार दिवाकर हे माझे आवडते लेखक आहेत. दिवाकरांची नाट्यछटा ही मराठी सारस्वताचे एक भूषण आहे. ही दिवाकरांनी हाताळलेली नाट्यछटा एक नाट्यप्रकार म्हणून संस्कृतमधील 'भाण' या नाट्यप्रकाराशी मिळती-जुळती आहे. दिवाकरांना या घटनेची जाण दिसत नाही. आपण हाताळीत असलेल्या नाट्यप्रकाराचा भारतीय परंपरेत एक इतिहास आहे याची जाणीव दिवाकरांना असणे अपेक्षितच नाही, पण जर अशी जाणीव त्यांना झाली असती तर केवळ साहित्य म्हणून, एक वाङ्मयप्रकार म्हणून दिवाकरांनी जी नाट्यछटा हाताळली ती, प्रयोगक्षम नाट्यप्रकार म्हणन त्यांनी हाताळली असती. मला असे वाटते की, जर ही घटना घडली असती तर आज आहे त्यापेक्षा दिवाकरांची नाट्यछटा अधिक वैचित्र्यपूर्ण व समृद्ध झाली असती. हा माझ्या ध्यानी आलेला मुद्दा इ. स. १९७१ साली एका लेखात मी मांडलेला आहे त्याच वेळी मी 'उभयाभिसारिका' या भाणाचा अनुवादही प्रकाशित केलेला आहे. आनंद साधले यांचा अनुवाद ललित वाङ्मय लिहिण्याची सवय नसणाऱ्या माझ्यासारख्या रुक्ष लेखकाने केलेला अनुवाद आणि ती सवय असणाऱ्या साधले यांच्यासारख्या अनुवादात खुलणाऱ्या लेखकाने, केलेला अनुवाद दोन्हीही आता वाचकांसमोर आहेत. चतुर्भाणी बावनखणी / २५१