पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि न लाजता मला हाक का दिलीस हे तर सांग.  काय म्हणतेस? भगवान अप्रतिहशासन पाटलीपुत्र सम्राटांच्या प्रासादात, पुरंदरविजय संगीतकाचा रसाभिनयासह प्रयोग होणार आहे व त्यात भूमिका करण्यासाठी देवदत्तेसह तुलाही निमंत्रण व इसार ३० मिळाला आहे ? आणि तुझ्या या प्रगतीचे मी कारण आहे ? असे म्हणू नकोस. शरीराच्या रोमारोमातून जिथे चांदणे ओसंडते आहे, त्या पौर्णिमेच्या शोधासाठी दिवा लागत नसतो.
 बलवंतांना इतर कुणाच्या आधाराची गरजच काय? तुझ्या प्रगतीचे कारण तूच आहेस. म्हणून तर लुब्ध रामसेन माझ्या पुढे-पुढे करतो.
 भुवया वेळावीत प्रसन्न प्रियंगुसेना लाजलेले गाल लपवण्यासाठी तोंड फिरवून हसते आहे. चला, रामसेनेला सेवेचे फळ मिळाले. काय मूर्ख आहे पहा देवदत्ता ! हिच्याशी स्पर्धा करू पाहते. रूपयौवनाची संपत्ती, चार ३१ प्रकारच्या अभिनयाच्या अभिनयाची सिद्धी. बत्तीस हस्तप्रकार, अठ्ठावीस प्रकारची दृष्टी, सहा स्थाने, तीन गीते, आठ रस आणि नृत्तांग व लय, सारेच हिच्या आश्रयाने शोभिवंत झाले आहे. ह्या वेशात तर ही देव, असुर आणि ऋषी कुणाचेही मन चोरील. हे सुभगे, तुला नृत्याची गरजच काय? कोणत्याही सामन्यात जय मिळविण्यासाठी तुझे केवळ लीलालास्य पुरे आहे.
 (परिक्रमा) अरे, ही कोण? नारायणदत्तेची दासी कनकलता. आपल्या पुष्ट स्तनांना गंधचूर्ण लावून, बुचड्यावर फुले माळून, हसत, ठुमकत इकडे येत आहे. काय म्हणतेस? प्रणाम करतेस? बाळे, सजणाची जिवलग हो. तुझ्या पदन्यासाची कृपा रस्त्यावर काय म्हणून?
 काय म्हणतेस? असाच लोभ असावा? सोड या फालतू अवान्तर बाबी. मला सांग, चक्रवाकाची जोडी फुटली कशी?
 काय म्हणतेस? विरहतप्त नारायणदत्ता स्नान, भोजन, अलंकाराचा त्याग करून अशोकवनात अशोकवृक्षाखाली एक शिलातलावर बसली होती? नवचंद्रमंडळ, भ्रमर गुंजारव आणि वसंतपुष्पांच्या मादक गंधाने कठोर झालेला दक्षिण वायू यांनी संतप्त अशा त्या आज्जुकेला सखीजन सांत्वना देत होत्या?
 तेव्हा समोरून कुणी तरी व्यक्ती कामपीडित काकली ३२ स्वरात वक्त आणि अपवक्त छंदात गीत गात बाजूने गेली. ते गीत असे– 'जो प्रियेसह वसंतात क्रीडा करीत नाही त्याचे रूपयौवन व वैभव फोल आहे.'

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण / २४७