पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊन त्या उद्योगावर चरितार्थ चालवीत असतो, पण बोलताना मात्र तो आपण मित्रकार्य करतो आहोत असे बोलतो. सर्वांनाच व्यावहारिक सत्य माहीत असते. सर्वांनीच एक अभिनय चालू ठेवलेला असतो. भाणामधून शब्दांतून दिसत असेल तर तो संकेतमान्य अभिनय आहे. शब्दांमागे जाऊन व्यवहारातील सत्य अनुमानाने जाणायचे असते.
गणिकावस्तीची परिभाषा   गणिकावस्तीची एक स्वतंत्र परिभाषा आहे. या परिभाषेचा विट अवलंब करणार हे उघडच आहे. मराठीत ही परिभाषा फारशी समृद्ध नाही. या परिभाषेत अनेक शब्दांना स्वतंत्र ध्वन्यर्थ आहेत. विटांच्या बोलण्याला जरी भोगविलासाचा गंध असला, तरी त्यांचा रंगेलपणा शब्दापुरता आहे. त्याचा खवचटपणा, मिस्किलपणा आणि विनोद हा मात्र खरा आहे. विटामध्ये उपहासाची शक्तीही खूप मोठी आहे. भाणात काव्यही भरपूर आहे. काही ठिकाणी अतिशय चांगला कल्पनाविलास आहे, पण कल्पकता आणि काव्य भाणात मध्यवर्ती नसून शृंगार आणि उपहास यांचे स्थान या ठिकाणी मध्यवर्ती आहे.
 रतिकलहात रुसलेल्या प्रेयसीची समजूत घालण्याचे काम विट पार पाडतो. कारण प्रेमही त्यानेच जुळविलेले असते. नायक पैसेवाला व उदार असला म्हणजे विट त्याला दानशूर म्हणतो. हा दानशूर नायक तरुण आणि देखणा असला, गणिकेच्या इच्छेनुसार वागणारा असला, तर ही घटना सुखाची आहे. एरव्ही दुःख समजावयाचे. गणिका नेहमी मत्सरी प्रेयसी असते. नायक-प्रियकराकडे चार दिवस, पुन्हा घरी धंदा, पुन्हा प्रियकराचे घर- असा गणिकेचा नित्य प्रवास चालू असतो आणि विट सर्वांनाच लोचटपणे बोलतो. सर्वांनाच सोयीस्कर उपदेश करतो. तो नपुसकेलासुद्धा बहुपुत्रा होण्याचा मिस्किलपणे आशीर्वाद देतो.
 जे गणिकांच्या वस्तीत येऊन सर्वस्व गमावतात, त्या मूर्ख लोकांविषयी विटाला सहानुभूती नसते, फक्त जिज्ञासा असते. जे संन्यास घेऊन चोरटा विलास करतात, त्यांच्याविषयी विटाला तिरस्कार असतो. कारण धंदा म्हणून ही परिस्थिती त्याला परवडणारी नसते. विट सर्वांना आश्वासने देतो. ती आश्वासनेही विटाच्या चतुर भाषणाइतकीच खोटी असतात. गणिकाही त्याला आपल्या

२३८/ रंगविमर्श