पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरजेनुसार मित्र मानतात. जिला त्याचा उपयोग असतो, ती त्याचे आभार मानते. जिला त्याचा उपयोग नसतो, ती तोंड फिरवते. विट प्रत्येक गणिकेला 'तू कुणाकडून आलीस' हा कायम प्रश्न विचारतो. गणिकांच्या वस्तीत हा प्रश्न अपेक्षित असतो. त्याचे उत्तर अभिमानाने दिले जाते. कारण त्या समाजात या व्यवहारात गुप्त असे काहीच नसते.
 आपल्या अलीकडील नाटकांत स्थळ बदलत नाही. संस्कृत नाटकात नांदीनंतर नाटक सुरू होते, भरतवाक्याने संपते, परिक्रमेने स्थळ बदलते. या बाबी लक्षात घेतल्यास यापुढील भाण आस्वादणे सोपे जाईल. हा सर्वांत छोटा भाण वररुची याच्या नावाने उपलब्ध आहे. हा वररुची म्हणजे व्याकरणकार वररुची नव्हे.

'वररुचिकृत',१

उभयाभिसारिका

(नांदी संपल्यावर सूत्रधार येतो.)

 कोण २ तू माझा, मी तरी तुझी कोण ? हे शठा, माझा पदर सोड. तोंडाकडे काय पाहतोस? मी का तुझ्यासाठी व्यग्र आहे ? सुभग, हे खरे नाही. हे चंचला, दूर हो. तुझ्या प्रियेच्या दंतक्षतांनी अंकित असे तुझे ओठ मी ओळखते. त्या रुसलेलींचा रुसवा काढ, मी ती नव्हे. त्या मनबाधेची मनधरणी कर ती तुझी. अशा प्रकारची वचने कामपीडित स्त्रिया तुम्हांला प्रणय-कलहात ऐकवोत.
 हे तुमच्यासाठी आहे महाराजा ! अरे मी बोलू इच्छीत असताना मध्येच हे काय ऐकू येत आहे ? (कान देऊन व कक्षेकडे पाहात) पहा तर काय देखावा आहे !

 वसंताच्या आगमनामुळे हिरमुसलेला लोधवृक्ष ३ 'मित्रकार्यामुळे ४ गडबडून गेलेल्या विटासारखा दिसत आहे.
 (जातो. विट प्रवेश करतो.)  विट : वा ! काय थाट आहे ! मोहरलेले आंबे आणि कोकिळा, झोके, उंची आसवे, अशोक आणि चंद्र ! मदनाचेही मन विचलित करणारी ही वसंताची चिरपरिचित शोभा.
 कामीजन परस्परांच्या चुकांना क्षमा करीत आहेत. सम्राटाच्या आज्ञेप्रमाणे

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण / २३९