पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स्तब्धच होते. शेवटच्या सहा वर्षांत त्यांनी पुन्हा नऊ नाट्यछटा लिहिल्या. आरंभीच्या नाट्यछटा आणि नंतरच्या नाट्यछटा असे वर्गीकरण दिवाकरांच्याबाबत केवळ काळाच्या आधारे करावयाचे आहे. नाट्यछटांचे अंतरंग पाहून व्यक्तित्वाच्या विकासाच्या वाङ्मयात आढळणाऱ्या खाणाखुणा पाहून असे वर्गीकरण करता येत नाही. लेखकाच्या वयाच्या वाढीबरोबर त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व व्हावे आणि वाङ्मयात प्रतिबिंबित व्हावे ही अपेक्षा दिवाकरांचे लिखाण पूर्ण करीत नाही.
कृती- उक्तीतला विरोध  या नाट्यछटा आकाराने फारशा मोठ्या नाहीत. त्यांतील सर्वांत मोठी नाट्यछटा सत्तावन्न ओळींची आहे. इतर बहुतेक तीस-पस्तीत ओळींच्या आहेत. पाने आणि ओळी हे बहिरंग सोडून आपण अंतरंगाकडे वळलो, म्हणजे आपणास अतिशय विविध आणि जिवंत अनुभवांच्या नाट्यजगात प्रवेश केल्याचे आढळून येते. या नाट्यछटांमधील नाट्य तसे स्थूलच आहे. बहुतेक वेळी बोलणे आणि वागणे यांतील विरोधच निरनिराळ्या व्यक्तींच्या रूपाने आपल्यासमोर येतो, हेही खरे आहे. काही वेळेला माणसे बोलल्याप्रमाणे वागण्याचे ठरवितात आणि या त्यांच्या स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या जिद्दीतूनच फार मोठे संघर्ष उभे राहतात. वागण्या-बोलण्यात विरोध असणे, हा सामान्यांच्या जीवनाचा परिपाठ आहे. वागण्या-बोलण्यात संगती ठेवण्याच्या धडपडीतून असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत असतो. दिवाकरांच्या नाट्यछटेत या प्रकारचे नाट्य टिपलेले नाही. परस्परविरोधी अशा प्रेरणांच्या ताणांत माणसाची इच्छाशक्ती कधी बधिर होऊन जाते. त्या अवस्थेत तो स्वतःशी काही बोलू लागतो, काही स्पष्टीकरण करू लागतो. ही किंकर्तव्यमूढताही नाट्यरूप घेते. नाट्यछटेत असे घडताना दिसत नाही. फार खोल असे चिंतन, जीवनदर्शन अगर जीवनाच्या गूढ रहस्याला स्पर्श असे काहीही दिवाकरांच्या नाट्यछटेतून दिसत नाही. तरीही पण या वस्तुस्थितीमुळे जे आहे ते फारसे खोल नसले तरी अतिशय नीटस, रेखीव, मोहक आणि जिवंत आहे, हे सत्यही नाकारता येत नाही. आपल्या या अतिशय मोजक्या लिखाणामुळे मराठी सारस्वतात दिवाकर आपला ठसा अमर करून गेले आहेत, यात शंकाच नाही.

२३० / रंगविमर्श