पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'

मर्यादा'

 या नाट्यछटा लिहिताना दिवाकरांनी स्वतःवर काही मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. या मर्यादांचा नाट्यछटेच्या केवळ बहिरंगावर परिणाम झालेला नसून अंतरंगावरही तो झालेला आहे. या नाट्यछटा लिहिताना त्यांच्या प्रयोगाची जाणीव दिवाकरांच्या समोर जवळजवळ नाहीच. प्रयोगाच्या दृष्टीने जर त्यांनी विचार केला असता, तर इतर अनेक बाबींचा विचार दिवाकरांना करावा लागला असता. त्याचा परिणाम नाट्यछटेच्या स्वरूपावर झालाच असता. माध्यमिक शाळांच्या स्नेहसंमेलनांतून या नाट्यछटांचे प्रयोग अधूनमधून होतात, पण कोणताही प्रयोग कधी फारसा यशस्वी होत नाही. नाट्यछटांचे प्रयोग पाहताना सतत हे जाणवते की, प्रेक्षकांना प्रयोगाशी समरस होण्याची वेळ येण्यापूर्वीच नाट्यछटेचा प्रयोग संपून जातो. नाट्यप्रयोगाची बांधणी काही प्रमाणात स्वतंत्रच असते. नाट्यप्रयोगाचा आस्वाद वैयक्तिक नसून तो सामूहिक असतो. या जनसमूहास प्रयोगाशी समरस होण्यासाठी काही अवधी असावा लागतो. प्रत्येक वाक्यातील खोचदारपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास संधी मिळावी लागते. प्रसंग आणि रचनांची विविधता, संवादांचे स्वरूप यांचाही विचार प्रयोगाच्या संदर्भात करावा लागतो. दिवाकरांच्यासमोर वैभवाने मिरवत असलेल्या रंगभूमीचे रूप ध्यानात घेतले, तर त्या रंगभूमीवर अनेक नट, अनेक प्रवेश, विविध देखावे, गायनाची समृद्धी असा फार मोठा पसारा दिसतो. ख्याल गायन रंगभूमीवर आकर्षक स्वरूपात उभे करण्याची धडपड एकीकडे आणि देखावे अधिक हुबेहूब करण्याची धडपड दुसरीकडे, या दोन प्रवृत्तींनी भारलेला असा तो रंगभूमीचा वैभवकाळ होता. प्रयोगाचा विचार जर दिवाकरांनी केला असता तर त्यांच्या नाट्यछटेचे स्वरूप मुळातच बदलून गेले असते. त्यांच्यासमोर नाट्यछटा होती ती फक्त वाचण्यासाठी होती.
गृहित वाचकवर्ग  आणि हा वाचकवर्ग दिवाकरांनी नेहमीच विशिष्ट वयाचा गृहित धरलेला आहे. त्यांच्यासमोर वाचक, श्रोता आणि प्रेक्षक म्हणून माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वावरतो आहे. विद्यार्थ्यांच्यासमोर जीवनाचा कोणता भाग यावा, याविषयी शिक्षकांच्या मनात काही संकेत ठरलेले असतात. सगळ्याच ललित

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण / २३१