पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाट्यशास्त्र नाटकीय व्यक्तींना पात्र म्हणत नाही. कारण पात्र हे फक्त अनुभव भरून ठेवण्यासाठी असते. ते फक्त बाह्य असते. नाट्यांतर्गत व्यक्ती या अशा साधनमात्र व वाहक नसतात. त्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते. म्हणून नाट्यशास्त्रात या व्यक्तींना प्रकृती म्हटले आहे. नट हा या प्रकृतीची भूमी असतो. हा नट पात्र आहे. या नटाला आपले व्यक्तीत्व आच्छादून टाकावे लागते. ते विसरावे लागते, त्याचा त्याग करावा लागतो आणि परभाव स्वीकारावा लागतो. हा परभाव जणू स्वतःचाच भाव आहे इतक्या समरसतेने नट स्वीकारतो. या भूमिकेचा एक अर्थ हाही आहे की नाट्यप्रयोगात लेखकाला जे म्हणायचे आहे ते व्यक्त होत नसते. नाट्याचा प्रयोग करणाऱ्यांना जे आकलन झाले आहे ते व्यक्त होत असते. प्रयोगकर्ते आणि नट हे नाट्यकृतीतील अनुभवांचे केवळ वाहक नसतात. ही मंडळी त्या नाट्याचे आद्य भाष्यकार असतात. नाट्यप्रयोगात नटाचे स्थान अनुकरण करण्याचेही आहे, समरस होण्याचेही आहे आणि भाष्य करण्याचेही आहे. नाट्यशास्त्राला नटाचे हे तिहेरी स्थान जागतिक समीक्षेच्या संदर्भात पहिल्यांदाच जाणवलेले दिसते. ही जाणीव या व्यवहारात नितांत महत्त्वाची आहे.
 लिखित नाटकात जे शब्द असतात, संवाद असतात आणि सूचना असतात त्यात सगळ्याच बाबी सांगितलेल्या नसतात. रिकाम्या राहिलेल्या जागा प्रयोगकर्त्यांना आणि नटांना भराव्या लागतात. आपण लिखित नाटक ही कलाकृती मानतो. ती कलाकृती असल्यामुळे एकात्मकही आहे आणि स्वयंपूर्णही आहे. मग यात नट भर घालतो म्हणजे काय घालतो? जर कलाकृती स्वयंपूर्ण मानल्या तर त्यात पडणारी अधिक भर अप्रस्तुत मानली पाहिजे. कारण पूर्णतेला या भरीची गरज नव्हती. नाहीतर दुसऱ्या बाजूने लिखित नाट्यकृती अपूर्ण मानल्या पाहिजेत. नटाने भर घातल्यानंतर त्या परिपूर्ण होतात; असे मानले पाहिजे. पर्याय हे दोन नाहीत. याखेरीज अजून पर्याय आहेत. एक पर्याय असा आहे की, नट ज्या तपशिलाची भर घालतो त्या बाबी मूळ नाट्यकृतीतच गृहित धराव्यात आणि नटाने जी भर घातली आहे ती लिखित नाट्यात गृहित समजावी. कवींना हे सोयीस्कर असले तरी हे पुरेसे सत्य नव्हे. हे जर सत्य असते तर शेक्सपिअरचा शतकानुशतके अभिनित झालेला हॅम्लेट एकसारखा दिसला असता. प्रत्येक श्रेष्ठ कलावंताची काही व्यक्तिवैशिष्ट्ये

२२६ / रंगविमर्श