पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. ती त्याची सामर्थ्य असतात. हे आपण मान्य करायचे की नाही, असा हा प्रश्न आहे, की लिखित नाट्यकृती स्वयंपूर्ण समजायची आणि या दोन परिपूर्ण आकृतिबंधांत अंग-अंगीभाव मानायचा? म्हणजे नाट्यप्रयोग हा अधिक समृद्ध परिपूर्ण मानायचा आणि त्याचा भाग असणारे नाटक हे थोडे कमी समृद्ध, पण परिपूर्ण मानायचे.
 नट हा स्वतःशी काही अभिव्यक्त करतो. नाटककाराच्या कल्पनेत नसलेली काही स्वतःची भर घालतो व त्या भूमिकेला आपल्या व्यक्तिवैशिष्ट्याने समृद्ध करतो असे मानल्याशिवाय आपल्याला नटाला कलावंत म्हणता येणार नाही आणि नट जर कलावंत मानायचा असेल तर लिखित नाटक या कलाकृतीपेक्षा प्रयोग नावाची एक वेगळी कलाकृती मान्य करणे भाग आहे. नाट्यशास्त्राने लिखित नाटक काव्यप्रकारात गृहित धरले आहे आणि नाट्यप्रयोग ही एक स्वतंत्र कलाकृती समजून त्याचे विवेचन केले आहे. हा मार्मिक सुजाणपणा जगाच्या वाङ्मयात नाट्यशास्त्रात प्रथमच व्यक्त झालेला दिसतो.
तीन प्रश्नसमूह
 कोणताही शास्त्रग्रंथ दोन पातळीवर वावरत असतो. आपला कालखंड, परंपरा, समजुती यांच्याशी तो शास्त्रविचार बांधलेला असतोच. या समकालीन संस्कृतीशी असणाऱ्या बांधलेपणामुळे एक भाग पुढच्या शतकांना कालबाह्य झालेला दिसतो. नाट्यशास्त्रातील कालबाह्य भाग सांस्कृतिक अध्ययनाचा विषय आहे, पण ज्यांनी एक समृद्ध नाट्यव्यवहार साकार केला ते काही चिरंतन प्रश्न उपस्थित करीतच असतात. नाट्यशास्त्राने असे जे तीन चिरंतन प्रश्नसमूह उपस्थित केले आहेत ते मी आपणासमोर ठेवले आहेत. एक प्रश्नसमह अनुकरणाच्या संदर्भात निर्माण होतो. दुसरा प्रश्नसमूह समावेशक कला या संदर्भात निर्माण होतो. तिसरा प्रश्नसमूह भावप्रत्ययाच्या संदर्भात निर्माण होतो. प्रत्येक समूहात दशकांनी प्रश्न उभे आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरे सहस्रकांच्या नंतर सुद्धा निर्णायकरीत्या देता आलेली नाहीत. प्रश्न उपस्थित करणे हे जर मोठेपणाचे गमक मानले तर आपल्याला असे म्हणावे लागेल की जे प्रश्न अॅरिस्टॉटलने उपस्थित केले आहेत त्यातले बहुतेक प्रश्न नाट्यशास्त्रानेही उपस्थित केले आहेत, पण त्याखेरीज कितीतरी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत,

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २२७