पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजावर होणारा परिणाम- नैतिक/अनैतिक
 ज्या क्षणी आपण वाङ्मयात व नाट्यात सुख देण्याची शक्ती गृहित धरतो तिथेच आपल्याला दुःख देण्याची क्षमताही गृहित धरावी लागेल. मानवी मनाची समृद्धी वाढविणे, मन विकसित करणे आणि नैतिक परिणाम साधणे हे जर नाट्याला शक्य असेल तर मग माणसाला वाईट वळणाला लावणे, त्याचे मन उद्ध्वस्त करणे, त्याच्या ठिकाणी विकृत आवडी निर्माण करणे हेही वाङ्मयाला शक्य मानले पाहिजे. विशेषतः ज्या पात्राशी आपण तन्मय होत असतो त्याचा मनावर परिणाम फार वाईट होतो. शतकानुशतके द्रौपदीचे वस्त्रहरण होताना खदखदा हसणारा दुर्योधन आपण आणि प्रेक्षक पाहत आलो, पण तो नेहमी प्रेक्षकांच्यासाठी तिरस्काराचा विषय राहिला. ज्या वेळेला छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा, उडाणटप्पू नायक वाङ्मयात दाखवलेला असतो व शेवटी त्याला नायिका मिळते असे चित्रण असते त्या ठिकाणी एक सामाजिक गुन्हेगारी समर्थनीय म्हणून तन्मय होऊन पाहावी लागते. असा प्रकार ज्या वेळी घडतो त्या वेळी वाङ्मयाचा परिणाम अनीतिप्रवर्तक होण्याची शक्यता गृहित धरावी लागते. वाङ्मयाने नैतिक परिणाम होत असतो या सूत्रातच हे गृहित धरलेले आहे की, समाजावर अनैतिक परिणाम सुद्धा वाङ्मयाने होणे शक्य आहे. त्याचा प्रतिकार करण्याचा हक्क समाजाला असला पाहिजे. नाट्यशास्त्राची ही भूमिका कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही, पण सत्य आणि अपिरहार्य ही एक जाणीव, उचित आणि समर्थनीय ही दुसरी जाणीव, या दोन जाणिवांचा सहानुभूतीच्या विकासाशी आणि भावगर्भ प्रतीतीशी नाट्यशास्त्राने जो संबंध जोडला आहे तो महत्त्वाचा आहे. यातून वाङ्मय व्यवहारातले न सुटलेले चिरंतन प्रश्न उत्पन्न होतात हे नाकारण्यात अर्थ नाही.
नटाचे तिहेरी स्थान
 याच संदर्भात नाट्यप्रयोगात नटाचे स्थान काय, हा प्रश्न उपस्थित होतो. खरे म्हणजे हा प्रश्न एकट्या नटापुरता नसून एकूण नाट्यप्रयोग बसविणाऱ्या सर्वांच्या पुरताच व्यापक आहे. कारण नटाला आपल्या भूमिकेशी समरस झाल्याशिवाय अभिनय करता येणे शक्य नाही. या समरस होण्याला मर्यादा आहेत हे जितके खरे तितकेच तिथे समरस होणे शक्य हेही खरे आहे. म्हणून

रं....१५
संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २२५