पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रंजनप्राधान्य असणारच. हाच रंजनवाद अलौकिक पातळीवर मांडला जाऊ लागला म्हणजे त्याला क्रमाने कलावादाचे रूप येते, पण नाट्यशास्त्राने हा मुद्दा इथे असा सोडलेला नाही. त्यांनी पुढे जाऊन हा प्रश्न उपस्थित केला आहे की माणसाचे रंजन का होते? नाट्यव्यवहारात दुष्यंताला शकुंतलेची प्राप्ती होते, मालतीला माधव मिळतो, चंद्रगुप्ताला राज्य मिळते, कौटिल्याला समाधान मिळते, प्रेक्षकांना काहीच मिळत नाही. मग प्रेक्षकांचे मनोरंजन का होते? त्याला नाट्यशास्त्राचे उत्तर असे आहे की, प्रेक्षक प्रकृतींशी समरस होतात आणि प्रेक्षक प्रकृतींशी समरस झाल्यामुळे प्रकृतींच्या लाभात आपला लाभ, त्यांच्या आनंदात आपला आनंद मानायला लागतात. या तादात्म्याच्या मुद्दयामध्ये दोन भिन्न बाबी गृहित आहेत. पहिली बाब म्हणजे ही की, तादात्म्याची कल्पना व्यक्तीच्या सहानुभावाचा विकास करणारी कल्पना आहे, म्हणून कलात्मक व्यवहाराच्या परिणामी व्यक्ती समाजाच्या सुखदुःखाशी अधिक निर्दोषपणे समरस होतात व व्यापकपणे समाजाच्या सुखदुःखाशी समरस होणारा एक नागरिक जन्माला येतो. म्हणून वाङ्मयाचा परिणाम समाजाला कल्याणकारी असतो, पण ही तादात्म्याची कल्पना अजूनही एक बाब सांगते. ती बाब अशी आहे की जे आपण समर्थनीय, आदरणीय मानतो त्याच्याशीच आपण समरस होऊ शकतो. यामुळे वाङ्मयामधील चित्रण प्रेक्षकांना नुसते सत्य व अपरिहार्य वाटून चालत नाही. ज्या दृष्टिकोणातून ते चित्रण होते तो दृष्टिकोणही समर्थनीय वाटावा लागतो. जे सत्य समर्थनीय वाटते तेच अधिक निर्दोष भावगर्भ प्रत्यय देऊ शकते असे मानले म्हणजे वाङ्मयाचा परिणाम अंतिमतः नैतिक समजावा लागतो. वाङ्मय आणि नाट्य नाट्यशास्त्राने उपदेशजनक आणि बुद्धीविवर्धक असे मानले आहे. कलात्मक व्यवहारात व्यक्तींना चारित्र्याचे शिक्षण देण्याची क्षमता असते असे मानतात ते यामुळे. वाङ्मय व्यक्तींची भावनात्मक समृद्धी साधू शकते. त्यांच्यावर नैतिक परिणाम करू शकते, त्यांच्या मनाचा विकास घडवू शकते. त्याचे कारण व्यक्तींना स्वतःकडे आकर्षित करून घेण्याची व स्वतःत समरस करून घेण्याची वाङ्मयात शक्ती असते हे आहे. नाट्यशास्त्रात याला प्रेक्षकांचा भावानुकरणात प्रवेश असे म्हटले आहे. ललित वाङ्मयातील जीवनसन्मुखता, कलात्मकता, तेथील रंजन आणि बोध या सर्वांनाच एकत्र सांधणारा हा भावगर्भ प्रत्ययाचा मुद्दा असतो. या भावगर्भ प्रत्ययामुळेच प्रचार शक्य होतो.

२२४ / रंगविमर्श