पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाली. अशी कोणतीही परिस्थिती नसताना इतरांच्या भावना समरस होऊन माणूस समजून घेऊ शकतो हे मान्य करण्यावरच वाङ्मयीन व्यवहार अवलंबून आहेत. कवी लोकव्यवहार पाहून आपल्याखेरीज इतर हजारों व्यक्तींच्या भावभावनांशी समरस होऊन त्यांचा विचार करू शकतो. त्यातून काल्पनिक पात्रे जन्माला घालू शकतो आणि प्रेक्षक या काल्पनिक पात्रांना आपली सहानुभूती देऊन भावप्रत्यय घेऊ शकतो. भावनिर्मिती नसताना प्रेक्षकांच्या सहानुभूती व तादात्म्याच्या आदरावर भावप्रत्ययाची शक्यता गृहित धरल्याशिवाय आपल्याला वाङ्मयीन व्यवहार स्पष्ट करताच येणार नाही. प्रेक्षकांचे नाट्यव्यवहारातील तादात्म्य कसे स्पष्ट करावे, हा एक अवघड मुद्दा आहे. कै. न. चिं. केळकर यांच्या सविकल्प समाधीच्या सिद्धान्तावर वामन मल्हार जोशी यांनी घेतलेले मार्मिक आक्षेप जर लक्षात घेतले तर तादात्म्य या कल्पनेची रेखीवपणे मांडणी करता येणे अधिकच कठीण काम आहे हे लक्षात येईल, पण तरीही वाङ्मय व्यवहारात, नाट्य व्यवहारात तादाम्य ही कल्पना गृहित धरावीच लागते. कवीला समरस होऊन जगव्यवहार पाहावा लागतो त्यातही तादात्म्याची एक कल्पना आहे. प्रेक्षकांना समरस होऊन नाट्यास्वाद घ्यावा लागतो. इथेही तादात्म्याची दुसरी कल्पना आहे. नाट्यशास्त्र या प्रेक्षकांच्या समरस होण्याच्या प्रश्नाचा विचार 'सिद्धी' या नावाने करते. प्रेक्षकांना भावगर्भ प्रत्यय येतो, तो तादात्म्यामुळे असे नाट्यशास्त्राचे मत आहे.

प्रेक्षक व नाटक

 या ठिकाणी आपल्याला एकाएकी दोन भिन्न दिशांनी आपला प्रवास सुरू झाला आहे असे लक्षात येते. पहिली गोष्ट म्हणजे ही की, प्रेक्षकांना नाटक आवडले पाहिजे. जे नाटक प्रेक्षकांना आवडू शकत नाही ते प्रचाराच्या दृष्टीने निरुपयोगी आहे आणि मनोरंजनाच्या दृष्टीनेही निरुपयोगी. म्हणून नाटक प्रेक्षकांना आवडले पाहिजे हा पहिला मुद्दा आहे. इथून सर्व रंजनवादाचा आरंभ होतो. नाट्य हे श्रवणमधुर आहे, प्रेक्षणीय आहे, ते सुखाश्रय आहे, ते विनोदजनक आहे, तिथे विश्रांती असते. त्यात शोभा आणि रंजन असते. ते रागजनक आहे. हे एक क्रीडनीयक आहे अशा अनेक पद्धतीने रंजनवादाची मांडणी नाट्यशास्त्रात झालेली आहे. तो प्राचीन जगातील गणिकांचा व्यवहार असल्यामुळे तिथे

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २२३