पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निश्चितच नाहीत. कारण जेव्हा भीम क्रोधाने तापलेला असतो तेव्हा दुर्योधन तुच्छतेने हसत असतो. हे दुर्योधनाचे हसणे प्रेक्षकांचेही नव्हे आणि ते कवीचेही नव्हे. नाट्यशास्त्राच्या मते भाव हे प्रकृतीचे आहेत. हे जे प्रकृतींचे भाव, त्यात एक नायक असतो, या नामकप्रकृतीचे स्थायीभाव प्रेक्षकांसाठी आस्वाद्य होतात. ते आस्वादविषय असल्यामुळे रस होतात. ललित वाङ्मयातील प्रकृतींना कवी आणि प्रेक्षक यांच्याखेरीज निराळे असे स्वतंत्र अस्तित्व नाट्यशास्त्र मानते. या प्रकृती लोकव्यवहारातल्या व्यक्ती नाहीत. त्या काव्यव्यवहारातल्या व्यक्ती आहेत. कारण काव्यव्यवहारात पुष्कळदा काल्पनिक कथाही आहेत. यांना नाट्यशास्त्रात उहयू कथा म्हटले जाते. तिथेही प्रकृती आहेत. वाङ्मयाचे एक स्वतंत्र जग, या जगात असणाऱ्या व्यक्ती म्हणजे प्रकृती. या प्रकृतींच्या ठिकाणी निरनिराळ्या भावभावना आहेत. ही नाट्यशास्त्राची भूमिका आहे. नाट्यशास्त्रातील भाव प्रकृतीगत आहेत. व्यभिचारी भावही प्रकृतींचे आहेत. स्थायीभावही त्यांचेच आहेत. तेच रस होतात. हा स्थायीभावच व्यभिचारींनी घेरलेला असतो. तोच रस होतो. म्हणूनच रससूत्रात स्थायीभावाचा वेगळा उल्लेख नाही.
कलात्मक व्यवहाराचा गाभा
 नाट्यात व्यक्ती आहेत, प्रसंग आहेत, विचार आहेत, वातावरण आहे, पण या साऱ्यांना फक्त भावगर्भ प्रत्ययाच्या संदर्भात महत्त्व आहे ही नाट्यशास्त्राची भूमिका एक महत्त्वाची वाङ्मयीन भूमिका आहे. ही भूमिका एकीकडे मानवी जीवनात कलात्मक व्यवहाराचे स्थान कोणते याचे उत्तर देते. कलात्मक व्यवहार व्यक्ती, विचार, प्रसंग यांच्या विविध दर्शनाने आणि जीवनदर्शनाने मानवी आकलन व्यापक व चौरस करतो हे खरे असले तरी तो या व्यवहाराचा आनुषंगिक परिणाम आहे. कलात्मक व्यवहाराचा मुख्य गाभा व्यक्तीचे आंतरजीवन भावसमृद्ध करून माणूस सुसंस्कृत करणे हा आहे हे या भूमिकेनुसार क्रमाक्रमाने येणारे उत्तर आहे. ही भावसमृद्धीची भूमिका दुसरीकडे कलात्मक व्यवहार आणि इतर व्यवहार यांची विभाजक रेषा आहे. मानवी जीवनात लौकिक व्यवहारातसुद्धा प्रत्येकाला भावनांचा उद्रेक भोगावाच लागतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात सुख, दुःखाचे प्रसंग येतात. या प्रसंगांच्यासह भावनांचे उद्रेक असतातच, पण ही व्यक्तिगत जीवनातील भावोत्पत्तीची कहाणी

२२२ / रंगविमर्श