पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रसांच्याशिवाय कोणताच अर्थ प्रवर्तित होत नाही अशी नाट्यशास्त्राची भूमिका आहे. नाट्यशास्त्रात धुवा, वृत्ती, स्वर, मुखराग, वाद्य अशा अनेक बाबींचा रसांशी संबंध आलेला आहे. म्हणून ती या ग्रंथातील महत्त्वाची कल्पना आहे यात वाद नाही, पण उत्तरकालीन मंडळींनी ठरविल्याप्रमाणे या ग्रंथात रसाचे स्थान आत्म्याचे नाही. रस हा नाट्यशास्त्रानुसार आस्वाद नसून आस्वादविषय आहे. भट्टनायकाच्या नंतर रस हा आस्वाद होतो. ही घटना नाट्यवाङ्मयाचा वैभवकाळ संपून गेल्यानंतरची आहे. नाटक वैभवात असताना रस ही आस्वाद्य वस्तू होती. तो आस्वादाचा विषय होता. खरी गोष्ट तर ही आहे की आस्वाद्य रस नसून स्थायीभाव आहेत. प्रेक्षक नाट्यशास्त्रानुसार स्थायीभावांचा आस्वाद . घेतात. हे स्थायीभाव आस्वादिले जातात म्हणून त्यांना रस म्हटले जाते. नाट्यशास्त्रापुरती भूमिका भावप्रत्ययाची आहे. हा भावप्रत्यय ज्या नाटकातून होतो तिथे प्रेक्षणीयत्व असण्याची शक्यता आहे. म्हणून नाट्यशास्त्रात रस या कल्पनेच्याखेरीज राग, शोभा, रंजन अशा तीन वेगळ्या कल्पना आलेल्या आहेत. भाव आस्वादिले जातात म्हणून त्यांना रस म्हणावे ही स्वतंत्र कल्पना आहे. हा आस्वाद शोभिवंत, रंजक, रागजनक कसा होईल ही एक स्वतंत्र कल्पना आहे. म्हणूनच मी असे म्हटले आहे की, नाट्यशास्त्राने भावगर्भप्रत्ययाच्या संदर्भात काही प्रश्न उभे केलेले आहेत.

भाव

 यातील पहिला प्रश्न हे भाव कुणाचे, हा आहे. नाट्यशास्त्रात ज्या भावांचे वर्णन आहे त्याच्या भिन्न पातळ्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. द्रौपदी-वस्त्रहरणासारखा प्रसंग घेतला तर या प्रसंगात युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीष्म, द्रोण यांच्या मनांत खेद आहे. दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांच्या मनांत आनंद आणि समाधान आहे. प्रेक्षकांच्यासाठी या सगळ्या प्रसंगांत प्रथम द्रौपदीशी तादात्म्य पावल्यामुळे करुण आणि नंतर भगवान कृष्णाने वस्त्रे दिल्यानंतर विस्मय व हर्ष आहे. पैकी प्रेक्षकांच्या मनांत जे भाव निर्माण होतात ते प्रेक्षकांचे आहेत यात वाद नाही. वाद आहे तो असा की, ज्या नाट्यांतर्गत व्यक्ती आहेत या नाट्यांतर्गत व्यक्तींना नाट्यशास्त्र प्रकृती असे म्हणते. या प्रकृतीच्या ठिकाणी असणाऱ्या भावभावना कुणाच्या आहेत? त्या प्रेक्षकांच्या

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २२१