पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काय? आणि जर असे कलात्मक व्यवहाराचे वेगळे जग आपण मानणार असू तर मग या वेगळ्या जगाचा लौकिक जगाशी संबंध कोणता आहे ?

रस कल्पनेचे स्थान कोणते?

 हा प्रश्न समजून घेण्यसाठी प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, नाट्यशास्त्रात रस या कल्पनेचे स्थान कोणते? भट्टतौतापासून पुढची मंडळी म्हणजे अभिनव गुप्तादी विवेचक नाट्य म्हणजेच रस असे मानतात. त्यांच्या दृष्टीने रस हा नाटकाचा आत्माही आहे. रस हेच नाटकाचे स्वरूपही आहे. रस हा नाट्याचा आत्मा आहे असे नाट्यशास्त्रात कुठेही म्हटलेले नाही. आणि रस म्हणजेच नाट्य असेही म्हटलेले नाही. नाट्यशास्त्रात आत्मा शब्द वापरलेला असेल तर तो दोन प्रकारे- एक तर नाट्याचे शरीर कधी शब्द म्हटले आहे, कधी इतिवृत्त म्हटले आहे. त्याबरोबरच नाट्याचा आत्मा म्हणून अवस्थेचा उल्लेख आहे. नाना अवस्थांतर हा आत्मा असल्याचा उल्लेख नाट्यशास्त्रात अनेकदा आलेला आहे. याखेरीज निरनिराळ्या रसांचे आत्मे म्हणून स्थायीभाव उल्लेखिलेले आहेत.. क्वचित प्रसंगी संचारीभावांचे आत्मेही सांगितलेले आहेत. नाट्यशास्त्रात आत्मा म्हणून ज्यांचा ज्यांचा उल्लेख आहे ते सर्व उल्लेख उपचारवजा आहेत. उलट ज्या रसाला कधीच आत्मा म्हटलेले नाही तोच भरतमुनींना आत्मा म्हणून अभिप्रेत आहे असे पुढीलांचे स्पष्टीकरण आहे. नाट्यशास्त्रात रसांचे महत्त्व सांगणारे सर्वांत महत्त्वाचे सूत्र असे आहे की, रसांच्याशिवाय कोणताही अर्थ प्रवर्तित होऊ शकत नाही. हे सूत्र रस हा नाट्याचा आत्मा आहे, हा आशय कसा सांगते हे समजून घेण्याचे माझे सर्व प्रयत्न आतापर्यंत वाया गेलेले आहेत.
 रसांच्याशिवाय कोणताही अर्थ प्रवर्तित होऊ शकत नाही हे सूत्र जसे नाट्यशास्त्रात आहे त्याप्रमाणे चारीच्याशिवाय कोणते अर्थ प्रवर्तन होत नाही, मुखरागाशिवाय शोभा निर्माण होत नाही अशीही सूत्रे नाट्यशास्त्रात आहेत. नाट्य अभिनयावर अवलंबून आहे, वृत्तीवर अवलंबून आहे अशीही सूत्रे आहेत. याचा अर्थ हा की ज्या वेळी जो विषय चालू असेल त्याचे मोठेपण सांगणे ही नाट्यशास्त्राची पद्धती आहे. नाट्यात कोणताही अर्थ प्रवर्तित व्हायचा असला तरी तो पात्र, वातावरण, संवाद, अभिनय यांपैकी कशाचा तरी भाग असावा लागतो. हे भागच विभाव अनुभाव व्यविचारी ही सामुग्री असतात. म्हणून

२२०/ रंगविमर्श