पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. जोपर्यंत आपण हे अनुकरण सांकेतिक मानतो तोपर्यंत कलात्मक व्यवहार एक सांस्कृतिक व्यवहार म्हणून गृहित धरावा लागतो आणि संस्कृती मूल्याशी निगडित असते. अनुकरण हा शब्द आपल्याला आवडो अगर न आवडो, त्यातील आशय असा अनेकविध मार्गांनी विकसित होणारा आहे. यातून काही वाङ्मयसमीक्षेतले चिरंतन प्रश्न उपस्थित होत असतात.

आस्वाद-भावगर्भ प्रत्यय त्याचे स्वरूप काय?

 नाट्यशास्त्राने उपस्थित केलेला माझ्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आस्वादाच्या स्वरूपाचा आहे. नाट्यशास्त्र असे मानते की, नाट्याचा आस्वाद एक भावगर्भ प्रत्यय असतो, आपल्या परंपरागत भाषेत या भावगर्भप्रत्ययाला रस असे नाव मिळालेले आहे. या रसचर्येच्या संदर्भात आलंबन विभाव, उद्दीपन विभाव, व्यभिचारी भाव, सात्विक भाव, स्थायीभाव, अनुभाव, अभिनय, प्रकृती, पात्र, रस, अशी सगळी परिभाषा निर्माण झालेली आहे. संस्कृत काव्यशास्त्राचा आणि नाट्यशास्त्राचाही हा मध्यवर्ती मुद्दा आहे, पण तो संस्कृत काव्यशास्त्रात, नाट्यशास्त्रात मध्यवर्ती मुद्दा आहे ही गोष्ट मी एका मर्यादेपेक्षा जास्त महत्त्वाची मानणार नाही. ज्या दिवशी भारतीय काव्यशास्त्राचा इतिहास लिहावा लागेल त्या दिवशी या इतिहासात ही कल्पना फार महत्त्वाची आहे असे सांगून आपल्याला थांबता येईल. ज्या स्वरूपात संस्कृत काव्यशास्त्राने रसव्यवस्था मांडली आहे त्या स्वरूपात ती ग्राह्य आहे की नाही याविषयीही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करता येईल. माझ्या समोर या क्षणी हे कोणतेही मुद्दे नाहीत. मी या प्रश्नाचा विचार नाट्यशास्त्राने उपस्थित केलेल्या चिरंतन प्रश्नाच्या संदर्भात करू इच्छितो. हा चिरंतन प्रश्न कलात्मक आस्वादात भावना या कल्पनेचे स्थान व स्वरूप असा आहे. याबाबत जवळजवळ सर्वांचे असे एकमत आहे की कलाकृतींचा आस्वाद हा भावगर्भ असतो. एकदा ही त्या प्रत्ययाची भावगर्भता मान्य केली म्हणजे मग इतर अनेक प्रश्न उद्भवतात. यांपैकी पहिला प्रश्न हा आहे की, नाट्यकृतीत ज्या भावनांचे चित्रण असते, या भावना कोणाच्या आहेत? या भावना आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांच्या, नाटक लिहिणाऱ्या नाटककाराच्या किंवा अभिनय करणा-या नटाच्या आहेत काय? की यांपैकी त्या भावना कोणाच्याच नसून त्यासाठी कलात्मक व्यवहाराचे एक वेगळेच जग मानणे आवश्यक आहे

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २१९