पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथा रंगवलेल्या असतात त्यांना देशकालविशिष्ट सत्यता असण्याची गरज नसते. गरज असते ते आस्वाद घेणाऱ्याला सत्य वाटण्याची. ही जी कलात्मक आस्वादात जाणवणारी एक जाणीव आहे तिचे वर्णन करताना सर्व प्राचीनांना हे म्हणावे लागले आहे की कलात्मक व्यवहारात जीवनाचे अनुकरण असते. कारण हा व्यवहार ज्या वेळेला सत्य म्हणून जाणवतो त्या वेळेला जीवनाची आठवण होतच असते. दुसरी जाणीव काहीतरी नवीन प्रत्ययाला येण्याची आहे. प्राचीन मंडळी या नावीन्याचे वर्णन आतापर्यंत लक्षात न आलेले सत्य असे करीत. म्हणजे पुन्हा ते अपूर्वता व नावीन्याचे वर्णन अनुकरणाच्या परिभाषेत करीत.

स्वप्नरंजन आणि वास्तववाद

 काव्य-नाटकादी व्यवहारात स्वप्नरंजन आणि वास्तववाद अशा दोन प्रवृत्ती सारख्या एकामागोमाग एक बलवान होताना दिसत असतात, पण स्वप्नरंजनही खरे वाटले पाहिजे, वास्तववादही खरा वाटला पाहिजे. अनुकरणाची कल्पना आस्वादप्रत्ययातील अपरिहार्यता व सत्य सांगणारी कल्पना आहे. ती एका बाजूने कलावंताला समाजजीवनाशी बांधीत असते आणि दुसऱ्या बाजूने रसिकांनाही कलांचा आस्वाद सामाजिक जाणिवांच्या सापेक्ष घेण्याला भाग पाडीत असते. या सामाजिक जाणिवा प्रेक्षकांच्या भावनांच्यावर फार मोठा प्रभाव गाजवीत असतात आणि कलांचाही समाजाच्या जाणिवेवर एक प्रभाव पडतच असतो. अनुकरण कितीही सांकेतिक असले तरी त्यात अंतिमतः हा लौकिक पक्ष गृहीत असतो. नाट्यव्यवहार आनंद देणारा असला तरी तो आनंद या लौकिक व्यवहाराशी निगडित असतो. ज्या क्षणी अलौकिकाचा मुद्दा उपस्थित होतो त्या क्षणी लौकिक जीवनाशी संबंध संपतो. खरे वाटले पाहिजे हा मुद्दाही संपतो. मग संकेत आणि स्वपरंजन यापलीकडे महत्त्व कशालाच राहत नाही. प्राचीनांच्या विचारविश्वात अनुकरणाच्या मुद्द्याने कला समाजाला बांधलेल्या आहेत आणि तरीही नवनिर्मितीमुळे कलावंताचे जे महत्त्व असते तो नाकारले जात नाही. कलात्मक व्यवहाराचा समाजजीवनाशी जो संबंध आहे याबाबतच एक पक्ष नेहमीच जीवनवादी राहणार निदान एक पक्ष तरी वास्तववादाला महत्त्व देणार. कुणीतरी असे म्हणणार की कलावंताने आपले खरेखुरे अनुभव मांडले पाहिजेत. हे मुद्दे जोपर्यंत उपस्थित होणार तोपर्यंत अनुकरणाचा मुद्दा बाद होत

२१८ / रंगविमर्श