पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक फूल निराळे असते, प्रत्येक पक्षी निराळा असतो. हे प्रत्येक आकृतीचे अनन्यसाधारणत्व आपण पाहतो. ते पाहत असताना एक मुद्दा आपण विसरलेलो असतो. हा मुद्दा असा की प्रत्येक माणसाच्या ठिकाणी वेगळेपण आहे ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच सर्व माणसांच्या ठिकाणी सारखेपणा आहे हीही गोष्ट खरी आहे. पानापानांत असणारे सारखेपण, फुलाफुलांत असणारे सारखेपण हे खोटे नसते. नाहीतर माणसाला माणूस म्हणून ओळखताच आले नसते. प्रत्येक जिवंत माणसाला हे साधारणत्वही आहे. जन्माला आलेले प्रत्येक मूल निराळे असते आणि सर्व मुलांच्यामध्ये एकसारखेपणाही असतो. साधारणत्व आणि अनन्यसाधारणत्व या परस्परविरोधी बाबी नसून साधारणत्वाच्या आश्रयाने व्याख्या करता न येणारे असाधारणत्व राहत असते ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच वाङ्मयाचा विचार करताना किंवा कलाव्यवहाराचा विचार करताना अनुकरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या अनुकरणरूप सामग्रीच्या आश्रयानेच नवनिर्मितीही असते.
खरे आणि अपरिहार्य  वाङ्मयीन आस्वादातील या दोन नित्य असणाऱ्या जाणिवा आहेत. एक तर कलाकृतीत जे आपण पाहतो ते आपल्याला खरे आणि अपरिहार्य वाटले पाहिजे आणि दुसरे म्हणजे आपल्याला काही तरी नवीनच जाणवते आहे असेही वाटले पाहिजे. यापैकी आपण जे पाहतो ते खरेही आहे आणि अपरिहार्यही आहे असे प्रेक्षकांना वाटत असते ते त्यांच्या जीवनविषयक अनुभवाच्या आधारे. लौकिक जगात माणूस जे अनुभव मिळवतो त्या आधारेच त्याची समजूत तयार होते. तिच्या आधारेच वाङ्मयीन आस्वादाचा पाया निर्माण केला जातो. जे समोर दिसते आहे ते सर्व असत्यच आहे, त्यात काहीच खरे नाही असे जोपर्यंत प्रेक्षकांना वाटते तोपर्यंत प्रेक्षक कलाकृतीचा समरस होऊन आस्वाद घेऊ शकत नाही. जीवन विविध आहे म्हणून या जीवनात भाबडी भावनाप्रधान माणसे आहेत हेही एक सत्य आहे. कठोर पाषाणहृदयी माणसे आहेत हेही एक सत्य आहे. जगात अलौकिक त्याग आहे हेही सत्य आहे आणि पराकोटीचा स्वार्थ आहे हेही सत्य आहे. तुम्ही कलाकृतीत काय दाखवावे हा प्रश्न नाही, प्रश्न आहे, तुम्ही जे दाखवले आहे ते खरे वाटण्याचा. प्रश्न ते खरे असण्याचा नाही. कलाकृतीत ज्या

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २१७