पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विभाववर्णनांचे संकेत आहेत. ही नाट्यव्यवहारातील सुखास्वादाची, संकेताची, निवड, औचित्याची कल्पना एका बाजूने गृहित धरायची म्हणजे ते बिंब प्रतिबिंब स्वरूपानुकरण नाही हे उघड होते आणि दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांच्यासाठी हे अनुकरण एकात्म व उत्कट आहे हे गृहित धरायचे. हे अनुकरण ज्या माध्यमाने करावे लागते त्यामुळे अनुकार्याचे विशिष्टत्व संपूनच जाते. म्हणून या अनुकरणात साधारणीकरणाची क्रिया गृहित आहे असेही मानावे लागते. या सगळ्या बाबी मान्य केल्यानंतर नाट्य व्यवहारात अनुकरण असते आणि नाट्यव्यवहारात नवनिर्मिती असते या दोन कल्पना परस्परसुसंगत होऊ लागतात. किंबहुना दोन्हीचा अर्थ एकच होऊ लागतो.
अनुकरणरूप सामग्रीद्वारे नवनिर्मिती  अनुकरण हा आजच्या समीक्षेचा लोकप्रिय शब्द नाही, याची मला जाणीव आहे, कारण आपण प्रतिबिंबकल्प सादृश्यापुरता अनुकरण शब्दाचा अर्थ मर्यादित केलेला आहे. या मर्यादित अर्थाने कलात्मक व्यवहारात अनुकरण नसते असे आपण ठामपणे म्हणू शकू, पण हा मर्यादित अर्थ ज्यांच्यासमोर नाही त्यांची सर्व भूमिका केवळ नावडत्या शब्दामुळे सदोष ठरण्याची घाई करता येणार नाही. उलट आपल्याच मनातील कल्पना आपण पुन्हा एकदा तपासून घेतल्या पाहिजेत. पाश्चात्य जगाला दीड हजार वर्षे प्रमाण ठरलेला महान तर्कशास्त्रज्ञ अॅरिस्टॉटल होता. एवढ्या मोठ्या तर्कपंडिताने अनुकरण हे कलाव्यवहाराचे लक्षण का मानावे? याचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. अॅरिस्टॉटलचा आणि नाट्यशास्त्राचा काहीच संबंध नाही. भरत नाट्यशास्त्र ग्रीक चिंतनाने थोडे सुद्धा प्रभावित झालेले दिसत नाही, पण स्वतंत्ररीत्या नाट्यशास्त्रकारांना अनुकरण ही कल्पना मध्यवर्ती मानण्याची इच्छा होतीच. ते एकीकडे नाट्यधर्म सांगतात, जे लोकव्यवहारात नाहीत आणि दुसरीकडे लोकव्यवहाराचे अनुकरण सांगतात. असे या मंडळींनी का करावे? या प्रश्नाचे उत्तर देण्याच्यासाठी एक बाब आपल्यासमोर स्पष्ट असली पाहिजे. ती स्पष्ट नसल्यामुळे वाङ्मयसमीक्षेत अनेक घोटाळे निर्माण झालेले आहेत. प्रत्येक जिवंत माणूस ही एक अपूर्व निर्मिती आहे असे आपण मानतो, कारण हुबेहूब एकासारखा दुसरा माणूस नसतो. ही अपूर्वता, नवता हे सजिवांचे लक्षण आहे.

२१६/रंगविमर्श