पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानणार असू तर मग स्वर कशाचेही अनुकरण करोत अगर न करोत, स्वरांची सगळी रचना मिळून भावनांचे अनुकरण करीत आहे असे सांगणे शक्य असते. नाट्यशास्त्राच्या पद्धतीने सांगायचे तर संगीतात आणि वास्तूत भावना आणि कल्पनांचे अनुकरण असते. फक्त या अनुकरणाची साधने भिन्न असतात. हे उत्तर सर्वांना समाधानकारक वाटावे असे नाही. पण ते नाट्यशास्त्राचे उत्तर आहे. म्हणून इथे नोंदविले आहे आणि या नोंदीचा आधार नाट्यशास्त्रात गीताला अभिनय समजून ज्या रचना दिलेल्या आहेत तो आहे. उदाहरणार्थ, पंचमाने शृंगार सांगावा. शृंगार पंचमबहुल असतो. गीताने अभिनय करावा. वाद्याने प्रसंगाचे स्वरूप स्पष्ट करावे इत्यादी.

अनुकरण या शब्दाचे आपले आकलन
 या चर्चेतील खरा प्रश्न अनुकरण हा शब्द आपण कसा समजून घ्यायचा हा आहे. अॅरिस्टॉटलने हे अनुकरण विशिष्टाचे मानलेले नसून सार्वत्रिकाचे मानलेले आहे. नाट्यशास्त्राने अनुकरण ही कल्पना अतिशय गुंतागुंतीची गृहित धरलेली आहे. कारण या अनुकरणात सादृश्य तर आहेच. म्हणजे अनुकार्याशी असणारा सारखेपणा आहे पण त्याबरोबरच निवड आणि औचित्य याही बाबी गृहित धरलेल्या आहेत. म्हणजे लोकव्यवहाराचे अनुकरण करताना काय सांगायचे, काय सुचवायचे, कशाचा विस्तार करायचा, कशाचा संक्षेप करायचा याचे निर्णय घ्यावे लागणार. ते वस्तूचे जसेच्या तसे अनुकरण नाही. ते नाट्याच्या गरजेला अनुसरून असणारे अनुकरण आहे. ही नाट्याची गरज म्हणजे प्रेक्षकांना उपलब्ध होणारा भावगर्भ अनुभव. ही भावगर्भता उत्कट करणे हेही अनुकरणात गृहित आहे. सगळे नाट्य गीत, नृत्यावर आधारलेले असल्यामुळे नाट्यप्रयोगाचे विविध संकेत आहेत. म्हणून हे अनुकरण सांकेतिकही आहे. आणि त्यात शोभा व रंजन गृहित धरलेले असल्यामुळे हे अनुकरण प्रेक्षणीय, श्रवणीय, आस्वादनीय असले पाहिजे हेही त्यात गृहित आहे, यामुळे नाट्यानुकरणाचे विविध संकेत निर्माण झालेले आहेत.

 परिक्रमेने स्थळ बदलते हा असा संकेत आहे. गरजेपुरत्या कथानकाच्या बाबी विष्कंभक प्रवेशकांनी सुचवाव्यात असा एक संकेत आहे. कक्षावर्णनात अनेकविध प्रकारचे संकेत आहेत, सगळी नाट्यधर्मीच सांकेतिक आहे.

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २१५