पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या मांडणीतील दोष   या सगळ्या मांडणीत काही दोष आहेत हे उघड आहे. पहिली गोष्ट ही की संगीतात स्वर हे माध्यम असल्यामुळे तिथे अनुकरण दाखवता येणार नाही. हाच मुद्दा वास्तुकलेच्या संदर्भातसुद्धा म्हणावा लागेल. आधुनिक शिल्पांच्यामध्ये अनेक शिल्पे अशी आहेत, ज्या ठिकाणी लोकव्यवहाराचे अनुकरण नाही. हा या व्याख्येतला एक दोष आहे आणि दुसरा दोष असा आहे की अनुकरण : म्हटल्याच्यानंतर नवनिर्मितीच्या कल्पनेला अर्थ उरत नाही. ज्याचे अनुकरण केले जाते ते अनुकार्य केव्हाही अनुकरणापेक्षा श्रेष्ठ मानणे भाग आहे. नेमक्या जा जाणिवेमुळे संस्कृत काव्यशास्त्रात भट्टतैतांनी प्रथम अनुकरणाची कल्पना फेटाळून लावली. त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की नाट्यात अनुकरण असू शकत नाही. अनुकरणाचा मुद्दा फेटाळला म्हणजे नवनिर्मितीच्या मुद्द्याला महत्त्व येऊ लागते. हे सगळे आक्षेप नाट्यशास्त्राच्या संग्रहकाराच्यासमोर जर ठेवले असते तर त्याने कोणते उत्तर दिले असते हे आपल्याला माहिती नाही. कारण ही उत्तरे नाट्यशास्त्रात नोंदवलेली नाहीत, पण जे नाट्यशास्त्रात नोंदवलेले आहे त्याच्या आधारे आपण या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नाट्यशास्त्रातील उत्तर   हा प्रयत्न करताना संगीत आणि वास्तू या कलांच्याऐवजी आपण काव्याचाच विचार करू शकतो. कारण काव्यात अशा अनेक कल्पना असतात, ज्या कल्पनांना लोकव्यवहारात कोणतेही स्थान दाखवता येत नाही. उदाहरणार्थ सुरेश भटांनी एका कवितेत अंधाराच्या पखाली वाहून नेणाऱ्या सूर्याची कल्पना केली आहे. हा अंधाराच्या पखाली वाहणारा सूर्य ही एक कविकल्पना आहे. ही कोणत्याही लोकव्यवहाराचे अनुकरण करीत नाही असे म्हणता येईल; पण या कल्पनेच्या आधारे सर्व समाजात स्वातंत्र्याच्या उदयाबरोबर जे वैफल्य आले त्या वैफल्याच्या भावनेचे अनुकरण झाले आहे असेही म्हणता येईल. म्हणजे खरा प्रश्न अनुकरण कशाचे? अनुकरण म्हणजे काय? आणि ते कोणत्या साधनाने होते? हा आहे. नाट्यशास्त्र सर्व सामाजिक, सांस्कृतिक कल्पनांचे, सर्व जाणिवांचे अनुकरण मानते. आता जर आपण स्वरांच्या योगाने किंवा स्वरांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक भावगर्भ प्रतीती देणार असू आणि हे संगीताचे स्वरूप

२१४ / रंगविमर्श