पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिशब्द संघर्ष हा आपण सुचवीत असतो. ज्या ज्या ठिकाणी कोल्हा आहे त्या सर्व ठिकाणी जंबुक आहे ही कोल्याचीही व्याख्या नव्हे आणि जंबुकाचीही व्याख्या नव्हे. इतर वाङ्मयप्रकारात नाट्य असते, असू शकते. अनुकरण सिद्धांत कलात्मक व्यवहाराबाहेरही नाट्य असते, असू शकते असे प्रथम सांगायचे आणि नंतर नाटकाचे वर्णन करताना त्यातही काव्य असते असे सांगायचे, अशी आपली प्रथा आहे. ही प्रथा सोयीची असली तरी तिच्यात नाट्याची व्याख्या करण्याचे सामर्थ्य नाही. नाट्याची व्याख्या करीत असताना सर्व कलात्मक व्यवहारापैकी हा एक व्यवहार आहे असे आपल्याला प्रथम गृहित धरावे लागेल. म्हणून नाट्याच्या व्याख्येत सर्व कलात्मक व्यवहाराचा अन्वय साधण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच कलात्मक व्यवहारापैकी या व्यवहाराचे निराळेपणही सांगावे लागेल म्हणून कलात्मक व्यवहारातील व्यतिरेक सांगावा लागेल. नाट्याची व्याख्या कलात्मक व्यवहाराच्या संदर्भात अन्वय व्यतिरेकाने देणे आपल्याला भाग आहे आणि हे काम सोपे नाही. अॅरिस्टॉटलने अनुकरण हे सर्व कलांचे सामान्य लक्षण मानले आहे. नाट्यशास्त्रानेही अनुकरण हे नाट्याचे सामान्य लक्षण मानले आहे, नाट्य ही सर्वसमावेशक कला असल्यामुळे सर्वच कलांचे ते सामान्य लक्षण बनलेले आहे. हे अनुकरण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होते. नाट्यात हे अनुकरण वाक्अंगसत्त्वोपेतान म्हणजे वाणी, शरीर, आणि सत्त्व यांनी होते. यात अंग महत्त्वाचे आहे. अंगाभिनयाने लोकव्यवहाराचे अनुकरण करणे ही नाट्यशास्त्रासमोर नाट्याची कल्पना आहे. हे अनुकरण जर प्रेक्षकांना तन्मय करणारे आणि आस्वाद्य वाटणारे असेल तर तिथे हा प्रयोग यशस्वी झाला, प्रयोगाला सिद्धी लाभली असे म्हणावयाचे. नाट्यशास्त्राच्या या भूमिकेत अनुकरण हा कलाव्यवहाराशी अन्वय आहे. या अनुकरणाचे माध्यम अंगाभिनय हा नाट्याचा निराळेपणा म्हणजे व्यतिरेक आहे. या नाट्यव्यवहारात शेकडो यशस्वी, अयशस्वी प्रयोग होणार. जे प्रयोग अयशस्वी झाले तेही प्रयोग नाट्याचेच असणार. म्हणून मूल्यमापनाची कसोटी प्रेक्षकांच्या आस्वादावर आधारलेली आहे.

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २१३