पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेक्षकांना जाणवणारी आहे. प्रयोग बसविणाऱ्या घटकांना ती जाणवणारी नाही. कलाकृतीत जाणवणाऱ्या एकात्मतेचा आधार कलावंताचे मन असते की प्रेक्षकाचा आस्वाद असतो असा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नाट्यशास्त्राने या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे प्रेक्षकांचा आस्वाद हे दिलेले आहे. कलाकृतीतील एकात्मता निर्मात्या कलावंताच्या मनाच्या संदर्भातील नसून ती आस्वादक प्रेक्षकांच्या संदर्भातील आहे असा नाट्यशास्त्राचा मुद्दा आहे. निर्मिती करणाऱ्या अनुभवाची एकात्मता अभिव्यक्त करणाऱ्या माध्यमाची एकात्म जुळणी हे मुद्दे कलाकृतीच्या एकात्मतेच्या संदर्भात महत्त्वाचे समजायचे की आस्वादातील जाणवणारी एकात्मता ही महत्त्वाची समजायची हा वाङ्मय समीक्षेतला विवाद्य प्रश्न आहे. त्यात नाट्यशास्त्राने आपले मत आस्वादाच्या बाजूने दिलेले आहे. हे मत प्रमाण मानायचे असले तर सर्व वाङ्मयसमीक्षेची आणि कलासमीक्षेची मांडणी रसिकांच्या संदर्भात नव्याने करावी लागले आणि सौंदर्य वस्तुनिष्ठ असू शकते ही कल्पनाच आपल्याला वर्ण्य मानावी लागेल. नाट्य म्हणजे काय?  नाट्यशास्त्राने उपस्थित केलेला दुसरा महत्त्वाचा मुद्दा नाट्य म्हणजे काय? असा आहे. या मुद्द्याचे अॅरिस्टॉटलने दिलेले उत्तर धर्माची अनुकृती असे आहे. नाट्यशास्त्राने प्रधानतः भावाची अनुकृती आणि अनुषंगाने सर्व सुखदुःखमय लोकजीवनाची अनुकृती हे नाट्याचे स्वरूप मानलेले आहे. आपण आज नाट्याची जी व्याख्या समोर ठेवतो ती याहून निराळी आहे. आपण नाट्याचा आत्मा संघर्ष या कल्पनेच्या आधारे नाट्याची कल्पना स्पष्ट करू इच्छितो. हा संघर्ष दोन व्यक्ती, दोन विचार किंवा एकाच व्यक्तीच्या मनातील परस्परविरोधी अशा दोन कल्पना यांच्यामध्ये असतो, अशी आपली समजूत आहे. ही संघर्षाची कल्पना जितकी वाटते तितकी रेखीव नाही. कारण ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या सर्व ठिकाणी नाट्य आहे असे आपण म्हणू शकणार नाही. कथांच्या मध्येही संघर्ष असतो, कादंबऱ्यांच्या मध्येही संघर्ष असतो, काव्यातही संघर्ष असतो. इतिहास तर सगळा संघर्षाचाच भरलेला आहे. मग आपल्याला असे म्हणावे लागते की या सर्व ठिकाणी नाट्य आहे. जिथे जिथे संघर्ष आहे तिथे तिथे नाट्य आहे हे सांगितल्यामुळे आपण नाट्याची व्याख्या करीत नसतो. फक्त नाट्याला

२१२/ रंगविमर्श