पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपपत्तीतील महत्त्वाची अडचण ही आहे की कोणताही कलाप्रकार ज्या वेळेला आस्वादिला जातो त्या वेळी त्या आस्वादात रसिकांनी तन्मय व्हावे ही अपेक्षा असते आणि तन्मयतेत मनाच्या सगळ्या शक्ती एकत्र झालेल्या असतातच. ज्या क्षणी माणूस संगीतात रमलेला असतो त्या वेळी सर्वच शक्ती श्रवणात केंद्रित झालेली असते. म्हणून ही उपपत्ती कोणत्याही कलेला सोयीनुसार श्रेष्ठत्व देणारी आहे. भरत नाट्यशास्त्राची भूमिका याहून निराळी आहे. आस्वादासाठी अगर अभिव्यक्तीसाठी जी माध्यमे वापरली जातात त्या सर्वच माध्यमांचे काही सामर्थ्य असते. नाट्य हा कलाप्रकार उपलब्ध असणाऱ्या सर्व माध्यमांचे सर्व सामर्थ्य एकवटून वापरणारा असल्यामुळे आपल्या सर्वसमावेशकतेमुळे तो सर्वश्रेष्ठ कला-व्यापार आहे. सर्वच विद्या, कला, शिल्प तिथे वापरले जातात म्हणून त्याची श्रेष्ठता समुद्रासारखी आहे असे हे मत आहे. या मताचे वैशिष्ट्य यात आहे की नाट्य ही कल्पना इथे केवळ अभिनयापुरती गृहित धरलेली नसून एकूण प्रयोगासाठी जेवढ्या बाबी वापरल्या जातात त्या सर्वांना समावेशक अशी ही कल्पना झालेली आहे.
कलाप्रकारांची तुलना  कलाप्रकारांची अशी परस्परांशी तुलना करावी काय? कलाप्रकारांचे एकमेकाहून फक्त निराळेपण प्रतिपादन करावे की एकमेकापेक्षा श्रेष्ठत्वही सांगावे, हा एक विवाद्य प्रश्न आहे. जर फक्त निराळेपण सांगावे; कलाप्रकारांची तुलना करू नये असे आपल्याला वाटत असेल तर सर्व कलाप्रकार आपल्या कवेत सामावून घेणे हे नाट्याचे निराळेपण म्हणावे लागेल आणि अशा तुलना करावयाच्या असतील तर सर्व माध्यमाची सामर्थ्ये एकवटणारी कला म्हणून ही सर्वश्रेष्ठ मानावी लागेल. याच संदर्भात अजून एक प्रश्न उपस्थित होत असतो. नाट्यप्रयोग हा एका व्यक्तीचा एकात्म अनुभव नव्हे आणि तो प्रतिभेच्या स्फुरणातून साकार होणारा असाही प्रकार नव्हे. वादक, गायक, नट, नटी, सूत्रधार, देखावे निर्माण करणारे असे अनेकजण प्रयोगात सहभागी होत असतात आणि म्हणून नाट्यप्रयोग ही एक सामूहिक कृती असते. नाट्यप्रयोगाची एकात्मता नाट्यशास्त्राला मान्य आहे. सर्व प्रयोग अलातचक्रप्रतिम असावा असे नाट्यशास्त्राचे म्हणणे आहे, पण ही एकात्मता प्रयोगाचा आस्वाद घेणाऱ्या

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २११