पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणार नाही. प्रत्येक व्यवहारात श्रेष्ठतेची कल्पना त्या त्या व्यवहाराच्या अपेक्षेने राहील. कलात्मक व्यवहारात श्रेष्ठता ही मूल्य सांगणारी उपाधी आहे. हे मूल्यवाचक विधान माध्यमाच्या शुद्धतेच्या परिभाषेत मांडता येणे शक्य नाही, पण या एका हेत्वाभासाखेरीज इतरही बाबी पुष्कळ आहेत. संगीत ज्या पद्धतीने साकार होते त्यात स्वरनिर्मिती ही एक प्रकारची नसून अनेक प्रकारची आहे. कारण तिथे साधनांची अनेकता आहे. माध्यमाची कल्पना साधनावर अवलंबून नसून हे माध्यम ग्रहण करणाऱ्या इंद्रियांवर अवलंबून आहे असे म्हणताच शब्द मूलतः श्राव्य असल्यामुळे संगीत आणि काव्य हे दोन कलाप्रकार एकरूप होतात आणि शब्द फक्त लिखितच गृहित धरला तर मग चित्र आणि काव्य यांचे माध्यम एक होते. प्रत्येक माध्यमाचा फरक केवळ इंद्रियांच्या आधारे ठरवता येणार नाही असा याचा अर्थ आहे. मग एक माध्यम दुसऱ्या माध्यमापेक्षा वेगळे कसे ठरवायचे? शिवाय शिल्पाचे माध्यम घनता असून शिल्पाचे रसग्रहण प्रामुख्याने स्पर्शाने होते असेही त्यांचे मत आहे. क्षणभर हे मत आपण गृहित धरू आणि वास्तुकलेचे माध्यम कोणत्या इंद्रियांशी निगडित आहे असा प्रश्न आपण विचारू. माध्यमांची कल्पना इंद्रियांशी निगडित नाही असा याचा अर्थ आहे, पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट असेल तर ती ही की लय आणि ताल यांना पारखा झालेला स्वर संगीताला निरुपयोगी आहे. या लय, तालाचा बोध त्यांची प्रतीती इंद्रियांना होत नसून ती मनाला होत असते. माध्यमातील फरक काही प्रमाणात साधनांचे, काही प्रमाणात इंद्रियांचे, पण प्रामुख्याने ते फरक कल्पनांचे आहेत असे आपण म्हणणार असू तर मग आपल्याला नाट्य या कलेला माध्यम आहे, प्रयोग ही कल्पना इतराहून निराळी आहे असे मान्य करून एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणून नाट्याला मान्यता द्यावी लागेल. आपण कसाही विचार केला तरी माध्यमाच्या शुद्धतेवर कलाप्रकाराची श्रेष्ठता अवलंबून ठेवता येत नाही.
नाट्य- सर्व कलाप्रकारांचा समावेश  कवी पु. शि. रेगे यांनी याबाबत दुसरी उपपत्ती सुचवलेली आहे. त्यांचे म्हणणे असे की कला या मनांनी ग्राह्य करावयाच्या आहेत. त्या मनानीच जाणायच्या असतात. ज्या कलांच्या आस्वादात मनाच्या सर्व शक्ती एकवटून वापरल्या जातात तो कलाप्रकार इतरांपेक्षा श्रेष्ठ मानायला पाहिजे. या

२१० / रंगविमर्श