पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माध्यम आपण कोणते मानायचे? नाट्यकलेचे माध्यम नाट्यशास्त्रात अभिनय मानलेले आहे, पण हा अभिनय इतक्या विविध पातळीवर आहे की पुन्हा सर्व माध्यमे या ठिकाणी एकत्र येतात. संगीताच्या रूपाने स्वर, नृत्याच्या रूपाने लय व ताल, वाचिक अभिनयाच्या रूपाने सर्व शब्द, मुखरागाच्या रूपाने चित्र व शिल्प आणि देखाव्याच्या रूपाने सगळी वास्तूकला म्हणून शब्द, स्वर, रंग, आकार, घनता, ताल, लय ही सर्व माध्यमे अंगाभिनयाच्या खेरीज नाट्यात एकत्रित येणारी आहेत. अंगाभिनय हा नृत्य आणि नाट्याला समान असणारा घटक आहे. फक्त अर्थाचा अभिनय एवढाच नाट्यासाठी स्वतंत्र मानता येईल. नाट्याला जर आपल्याला ललित कलांच्यापैकी एक मानायचे असेल तर असे मानले पाहिजे की कोणत्याही कलेला माध्यम असते इतकेच खरे आहे. एका कलाप्रकाराला एकच एक माध्यम असते हे खरे नाही, विशेषतः हा प्रश्न सिनेमाच्यामुळे पुन्हा एकदा उपस्थित होणार आहे. कारण सिनेमाचे माध्यम छायाप्रकाश गृहित धरावे की नाट्याप्रमाणे नटाचा अभिनय गृहित धरावे, हे सांगता येणे सोपे नाही.
कलाप्रकाराचे माध्यम  नाट्य सोडून दिले तर इतरही बाबतीत माध्यमाचा विचार कै. मढेकरांनी केला आहे, तो तितका सरळ नाही. मर्डेकर एकेका कलाप्रकाराला एकेक माध्यम गृहित धरतात आणि या माध्यमाच्या शुद्धाशुद्धतेचा विचार करू लागतात. लौकिक जीवनाच्या अर्थाचा कोणताही संदर्भ नसणारे आणि फक्त कान या एकाच इंद्रियाशी निगडीत असणारे स्वर हे माध्यम त्यांनी सर्वांत शुद्ध आणि निष्कलंक ठरवले आहे आणि या माध्यमावर आधारलेली संगीतकला ही त्यांनी सर्वश्रेष्ठ ठरवली आहे. मढेकरांच्या या विचारात अनेक प्रकारचे हेत्वाभास दडलेले आहेत. यातील पहिला हेत्वाभास हा की ते शुद्धता हे श्रेष्ठतेचे गमक समजतात. शुद्धता हे काही ठिकाणी श्रेष्ठतेचे गमक असते. अशुद्ध सोन्यापेक्षा शुद्ध सोने हे बाजारभावाच्या दृष्टीने अधिक श्रेष्ठ व अधिक मूल्यवान ठरण्याचा संभव आहे, पण भोजनव्यवहारात आपण जर फक्त शुद्धतेचा विचार करू लागलो आणि तिखट, मीठ, तेल, मोहरी इत्यादींच्या संसर्गदोषामुळे पदार्थांची शुद्धता नष्ट होते म्हणून श्रेष्ठता नष्ट होते असे म्हणू लागलो तर ते कुणी मान्य र....१४

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २०९