पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कलांचा विचार करीत असते. या पाच कलांच्यापैकी साहित्य, संगीत, चित्र आणि शिल्प या कला अशा आहेत की ज्यांचा विचार करताना आपण एका · व्यक्तीची निर्मिती म्हणून त्यांचा विचार करू शकतो. वास्तू ही कला एका व्यक्तीची निर्मिती कधीच असू शकत नाही. फार तर एका व्यक्तीच्या कल्पनेत वास्तूचा आराखडा निर्माण होऊ शकतो, पण वास्तू या प्रकारातील कलाकृती नेहमीच एक सामूहिक निर्मिती राहणार. ललित कलांच्या यादीत एका सामूहिक निर्मितीचा समावेश केल्याच्यानंतर दुसऱ्या सामूहिक निर्मितीचा समावेश करायला हरकत नसावी. या पंचललितकलांच्या यादीत नृत्य आणि नाट्य यांचा समावेश पाश्चिमात्य परंपरेने केलेला नाही. पाश्चिमात्य परंपरेत नर्तकाला कलावंत मानत नाहीत किंवा नृत्याच्या वैभवशाली परंपरा नाहीत असे माझे म्हणणे नाही. त्या परंपरेने नाट्य, नृत्याच्या वैभवशाली प्रथा प्रतिष्ठेने जतन केल्या आहेत. त्या विकसितही केल्या आहेत. प्रश्न असा आहे की कलांचा विचार करताना गंभीरपणे या दोन कला मात्र विचारात घेतल्या जात नाहीत. पैकी नाट्य विचारात न घेण्याचे कारण आपण समजू शकतो. कारण नाट्यात त्याच्या प्रायोगिक रूपाच्यापेक्षा नाट्याचे साहित्यरूप म्हणजे लिखित नाटक महत्त्वाचे आहे असा ॲरिस्टॉटलचा सूर आहे. उरलेल्यांनी महर्षीच्या म्हणण्याला कळत-नकळत मान्यता द्यावी हे ओघाने आलेच. पण नृत्याचा विचार या यादीत का नसावा हे समजणे कठीण आहे.
लिखित रूप- काव्य म्हणून स्वतंत्र विचार  भरत नाट्यशास्त्राने नाटक या लिखित रूपाचा विचार काव्य म्हणून स्वतंत्रपणे केलेला आहे. या काव्याच्या भाषिक मांडणीबद्दल साहित्याच्या संदर्भात विचार करता येईल. हा विचार वृत्तांचा, अलंकारांचा, गद्यपाठ्याचा असाही आहे. तो कथानकाचा म्हणजे इतिवृत्ताचा आणि कथानकमांडणीचा म्हणजे संधी, संध्यंगांचा असाही आहे. पण या नाटक काव्याखेरीज नाट्यप्रयोग म्हणजेच नाट्य हे नाट्यशास्त्राने स्वतंत्र कला गृहित धरलेली आहे. केवळ ती स्वतंत्र कला गृहित धरलेली नाही तर सर्वसमावेशक म्हणून तिला सर्वश्रेष्ठ कलाही मानले आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न उपस्थित होतो तो हा की नाट्य ही स्वतंत्र कला मानावी काय ? या प्रश्नाचे उत्तर देणे वाटते तितके सोपे नाही. प्रत्येक कलाप्रकाराला स्वतःचे असे एक स्वतंत्र माध्यम आहे. नाट्यकलेचे

२०८ / रंगविमर्श