पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळी एका क्षणी त्या नटाला रुक्मिणी गृहित धरावी लागते, दुसऱ्या क्षणी अंगावर रुक्मिणीचा पोशाख असणाऱ्या नटाला कृष्ण गृहित धरावे लागते. या पद्धतीत प्रेक्षकाच्या तन्मयतेला सतत छेद जाणे अपरिहार्य आहे. नटाच्या तन्मयतेलाही छेद जाणारच. भाणासारखी एकपात्री पुन्हा पुनरुज्जीवित करण्याजोगी आहे असे म्हणताना माझ्या डोळ्यासमोर दिवाकरांच्या नाट्यछटा आहेत. दीर्घ लांबीच्या, विविध रसांच्या नव्या नाट्यछटा जर आपण प्रयोगात यशस्वी करून दाखवू शकलो तर ते केवळ जुन्या भाणांचे पुनरुज्जीवन ठरणार नाही, तर मराठी नाट्यप्रयोगात समृद्धी घालणारे आणि नटांच्या अभिनयकौशल्याला आव्हान देणारे साधन ठरेल असे मला वाटते. पु. ल. देशपांडे यांनी जे प्रयोग ‘बटाट्याची चाळ', 'असा मी असा मी' या रूपाने केले किंवा सध्या जे इतरांचे एकपात्री प्रयोग चालू आहेत त्यांचा अनुभव लक्षात घेता एकपात्री, एकप्रकृती असे भाण यशस्वी ठेवणे कठीण जाऊ नये असे मला वाटते.
 नाट्यामुळे पुण्य मिळते की नाही, ते ब्रह्मदेवाने उत्पन्न केले आहे की नाही या मुद्द्यात आज कुणाला रस असणार नाही. वेदव्यवहार हा त्रैवर्णिकांच्यासाठी जरी मानला तरी व्यवहारात वेदविद्या ब्राह्मणांची होती. या ब्राह्मणांच्या वेदविद्येतून काव्यांच्या परंपरा निर्माण होऊ शकतात. नाट्य हा शूद्रांचा व्यवहार मूलतः अवैदिक लोकपरंपरेचा व्यवहार असणार म्हणून वैदिक संवादसूक्तात जुन्या 'नाटकांचे अवशेष पाहू नयेत हे पुन्हा सांगण्याची गरज नसावी. कारण ही विद्या शूद्र गणिकांच्या वेशावस्तीत पल्लवित झाली आहे याचा उल्लेख यापूर्वी येऊन गेला आहे.
आजही महत्त्वाचे वाटणारे तीन प्रमुख प्रश्न  माझ्या मते नाट्यशास्त्राने आपणासमोर प्रमुख तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे तीनही प्रश्न आजच्या समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आजही या प्रश्नांची निर्णायक उत्तरे आपण देऊ शकू असे मला वाटत नाही.
कलात्मक व्यवहारात नाट्यकलेचे स्थान

 यापैकी एक प्रश्न असा आहे की कलात्मक व्यवहारात नाट्यकलेचे स्थान कोणते ? पाश्चिमात्य परंपरा ललित कलांचा विचार करताना प्रामुख्याने पाच

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २०७