पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन उदाहरण आपणासमोर भासाचे 'उरुभंग' आहे. आज जुन्या शोकांतिका उपलब्ध नाहीत; पण प्राचीन नाटकांच्यापैकी अशी काही नाटके उपलब्ध आहेत की ज्यांची प्रकृती शृंगारिक नसून गंभीर आहे. 'मुद्राराक्षस' हे गंभीर प्रकृतीचे उत्कृष्ट असे जुने नाटक आहे, आज आपणासमोर शोकांतिका उपलब्ध नसल्या तरी नाट्यशास्त्र ज्या काळात संग्रहीत केले गेले त्या काळात एक स्वतंत्र ‘रूपकप्रकार’ शोकांतिकांच्यासाठी ठेवावा एवढे मोठे प्राचुर्य शोकांतिकांचे होते असे मानणे भाग आहे. शोकांतिका ही भारतीय संस्कृतीला पारखी नव्हे. फक्त ती आपल्या व्यवहाराला काही काळ पारखी राहिली. पुढे आधुनिक नाटकांच्या काळात उग्र, गंभीर, शोकात्म, शोकांत असे सर्वच नाटक प्रतिष्ठित झाले. शोकांतिका हा प्रतिष्ठित वाङ्मयप्रकार म्हणून स्वीकारताना आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा एक घटक स्वीकारतो आहो असे मानण्याचे काही कारण नाही. आपण भास आणि वाल्मिकी यांचा व भरतनाट्यशास्त्राचा पुन्हा नव्याने आदर करतो आहोत असेही गृहित धरून चालता येईल.
भाण- एकपात्री एकांकिका  नाट्यशास्त्राने भाण नावाची एकपात्री एकांकिकाही रूपकप्रकार म्हणून नोंदवलेली आहे. आपल्या सुदैवाने चार प्राचीन भाण चतुर्भाणी या नावाने उपलब्ध आहेत. या नाट्यशास्त्राने मान्य केलेल्या एकपात्री प्रयोगाखेरीज लोकरंगभूमीवर अजून काही एकपात्री प्रयोग चालत असावेत असा अंदाजं 'साहित्यदर्पणा'तील व 'नाट्यदर्पणा'तील उपरूपकांच्या उल्लेखावरून करता. येईल, पण हे उल्लेख नाट्याच्या वैभवकाळाला उत्तरकालीन म्हणून बाजूला ठेवणे मी नाकारणार नाही. नाट्याच्या वैभवकाळात अतिशय जिवंत विनोदाने नटलेले भाग लिहिले गेलेले आहेत. भाण हा याचा पुरावा आहे की एकपात्री प्रयोग रंगभूमीवर यशस्वी होऊ शकतात. त्यांना स्वतंत्र रूपकप्रकार मानावा इतके यश एकेकाळी आलेले होते. हा प्रयोग आजही पुन्हा एकदा करून पाहण्याजोगा आहे.
 या ठिकाणी एकपात्री म्हणत असताना थोडासा खुलासा केला पाहिजे. रंगभूमीवर एकच एक नट असतो इतकाच याचा अर्थ नाही. ज्या वेळेला रंगभूमीवर एकच नट अनेक नाटकीय व्यक्तींच्या भूमिका वठवीत असतो त्या

२०६ / रंगविमर्श