पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



या सुखप्रयोगाचा जसा एक अनुषंगिक भाग एकाच नाटकात असणाऱ्या अनेक भाषा आहेत तसा दुसरा अनुषंगिक भाग नाटकाचा शेवट सुखपर्यवसायी व अद्भुत असा करणे हा आहे. हे सगळे काम धर्म, अर्थ अविरोधी चालायचे असल्यामुळे इतिहास-पुराणातील प्रख्यात पुरुषांच्या कथांवर नाटकांचा भर असणे स्वाभाविक होते. या सुखकल्पनेला अनुसरूनच नाट्यप्रयोगांचे काळ आहेत. शृंगारिक नाटक रात्रीच्या पहिल्या प्रहरात होते. म्हणजे पुढची रात्र सुखविलासासाठी मोकळी असली पाहिजे. करुणरसप्रधान नाटक रात्रीच्या शेवटच्या प्रहरी होते. म्हणजे हा प्रयोग सुखविलास संपल्यानंतर होतो. प्रयोग संपल्यानंतर माणसे दैनंदिन उद्योगाला जाऊ शकतात. धर्मारकान सांगणारा प्रयोग दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी होतो. गणिकाव्यवसायाला सुखाच्या सोयी पाहणे भागच असते. हाही सगळा भाग आजच्या नाट्यविचाराच्या दृष्टीने कालबाह्य मानला पाहिजे.
शोकांतिकेला स्थान होते  क्रमाने कालबाह्य भाग कोणता या विषयाचा विचार आपण करीत आहो, पण कालबाह्यता एवढेच या महाग्रंथाचे वैशिष्ट्य असू शकणार नाही. या ग्रंथाने काही कायम विचार करण्याजोगे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांच्याकडे आपण वळले पाहिजे, पण त्यापूर्वी एक दोन महत्त्वाच्या मुद्यांचा थोडक्यात विचार मी करू इच्छितो. अशी सर्वसामान्य समजूत आहे की भारतीय संस्कृतीत शोकांतिका नाही. भारतीय संस्कृतीत शोकांतिका का नाही याची स्पष्टीकरणेही अनेकांनी दिलेली आहेत, या सर्व स्पष्टीकरणांच्याविषयी अत्यंत आदर बाळगून हे नोंदविले पाहिजे की भारतीय परंपरा कोणे एके काळी शोकांतिकेला पारखी नव्हती. केवळ शोकांतिका म्हणून विचार करायचा असेल तर भारतीय परंपरेत अनेक कथा आहेत, पण शोकात्मिका बाजूला ठेवल्या तरी परंपरामान्य शोकांतिका म्हणून आपणासमोर रामायण आहे. रामायण करुणरसप्रधान महाकाव्य असल्याचा उल्लेख आनंदवर्धनाने केलेलाच आहे, पण नाट्यशास्त्राच्या दृष्टीने नाटकापुरता विचार जर आपण करू लागलो तर नाट्यशास्त्रात अंक या नावाचा एक रूपकप्रकार सांगितलेला आहे. हा रूपकप्रकार शोकात्म तर असतोच पण शोकांतही असतो; या रूपकप्रकाराचे

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २०५