पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक महत्त्वाच्या नाटकीय व्यक्तीसाठी स्वतंत्र वाद्यवादन आणि त्यांचे ताल आहेत. आज आपण नृत्य-नाट्य हा नाट्याचा एक भाग समजू आणि स्त्रियांना नाटक अभिनित करण्यासाठी वर्ज्य समजणार नाही, पण नाटक नृत्याभिनितच झाले पाहिजे आणि ते स्त्रीप्रधानच असले पाहिजे हा मुद्दा आता कालबाह्य झालेला आहे.
अनुषंगिक कल्पना  नाट्यशास्त्रातील शोभेची कल्पना प्रमुखतया तीन प्रकारची असली तरी या कल्पनेला अनुषंगिक अशा अजून काही कल्पना आहेत. त्यातील एक कल्पना अशी आहे की नाटकात प्रत्येक नाटकीय व्यक्तीची भाषा संकेताने ठरून गेली आहे. ज्या काळात संस्कृत नाटके लिहिली गेली त्या काळात संस्कृत ही लोकभाषा राहिलेली नव्हती. इ. सनाच्यापूर्वी पाचव्या-सहाव्या शतकातच म्हणजे भगवान बुद्धाच्याकाळी लोकभाषा या नात्याने संस्कृतचे अस्तित्व संपलेले होते, अभिजात नाटकांच्या वैभवाच्या काळात तर लोकव्यवहारातून संस्कृत समाप्त होऊन शतके उलटून केलेली होती, पण या नाटकांच्यामधून नायक आणि श्रेष्ठ पात्रे नेहमी संस्कृतात बोलतात. नायिकेने शौरसेनीतून बोलावे असे नाट्यशास्त्राचे मत आहे; पण शुद्रक, कालिदासापासून नायिका महाराष्ट्रीतून बोलत आहेत. डॉ. मनोमोहन घोष आणि डॉ. सुनितकुमार चॅटर्जी यांचे असे म्हणणे आहे की शौरसेनीचीच उत्तरकालीन अवस्था महाराष्ट्री आहे. जर त्याचे हे म्हणणे आपण मान्य करणार असू तर नायिका नाट्यशास्त्रातील आदेशानुसार शौरसेनीतून बोलत होत्या व आपल्या कल्पनेनुसार त्या महाराष्ट्रीतून बोलत होत्या या दोन्हीत विसंवाद राहणार नाही. डॉ. घाटगे यांना शौरसेनीची उत्तर अवस्था महाराष्ट्री ही कल्पना मान्य नाही. प्राकृत भाषांचा व्याकरणकार वररुची यालाही ही कल्पना मान्य नव्हती. पण या प्रश्नाची चर्चा भाषाशास्त्रज्ञांनी करावी हे इष्ट विदूषक प्राच्या भाषेत बोलत असत. शकारांच्यासाठी एक शकारी सांगितलेली आहे. इतक्या सगळ्या भाषा एकाच नाटकात जर येत असतील तर त्याचे कारण लोकव्यवहार नसून नाट्यसंकेत हे आहे. नाट्यशास्त्रात असे सांगितले आहे की सुखप्रयोग म्हणून गणिकांनीसुद्धा संस्कृतमधून बोलायला हवे. यासाठीच ‘मृच्छकटिकात 'ल्या एका अंकात वसंतसेना संस्कृतमधून बोलते.

२०४ / रंगविमर्श