पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोभेचे व सुखाचे तीन घटक
  हा कामपुरुषार्थाचा भाग असल्यामुळे सुख आणि शोभा याला नाट्यात प्राधान्य मिळणे भाग होते. या सुख व शोभेचे तीन प्रमुख घटक आहेत. पहिला घटक नाटकात काम करणाऱ्या सुंदर स्त्रिया हा आहे. नाट्यशास्त्रानुसार फुलांनी नटलेल्या वेली शोभाव्यात त्याप्रमाणे नाट्यात स्त्रिया शोभिवंत होतात आणि त्या सुखाचे हेतू होतात. या सुखाचा दुसरा घटक गीत आहे. गीताचा संबंध एकीकडे रसपाक बलवान होण्याशी आहे, दुसरीकडे गीताने रंजन आणि शोभा वाढते. प्राचीन भारतीय नाटकात असणारी गीते म्हणजे नाट्यशास्त्रात असणारी पदरचना नव्हे. नाट्यशास्त्रातील पद्य हा पाठ्याचा भाग आहे. गीते स्वतंत्र असत. त्यांचा ध्रुवागायनात वापर असे. या ध्रुवांच्या आधारे नाट्यातील अनेक बाबी सांभाळल्या जात. संस्कृत नाटकात समोरचा दर्शनी पडदा नाही. सर्व अंक एकप्रवेशी अंक आहेत. अशा वेळी अंक सुरू झाला हे कसे कळणार? नाटकातील अंक प्रावेशिकी ध्रुवागायनाने सुरुवात होत. नैष्क्रामिकी ध्रुवागायनाने अंक संपत. दोन अंकांच्या मधला वेळ नृत्याच्या इतर कार्यक्रमाने भरून काढता येत असे. म्हणून पडदे नसले तरी अंकांचे आरंभ व शेवट प्रेक्षकांना बरोबर कळत. याखेरीज नाटकात प्रासादिकी, अंतराच्छादा, आक्षेपिकी अशा तीन प्रकारच्या धुवा असत. हे संगीताचे प्राबल्य नाट्यप्रयोगाचा आवश्यक भाग होते. संगीत स्त्रियांनाच शोभते, पुरुषांचे गाणे माधुर्यजनक होत नाही असा नाट्यशास्त्राचा नियम असल्यामुळे गीतप्राधान्य आणि स्त्रीप्राधान्य परस्परांशी सुसंगत होते. शोभेचा तिसरा घटक नृत्य होता. नृत्याच्या आधारे सबंध नाटक अभिनित करून दाखविले जाई. म्हणून जुन्या पद्धतीने नाटक नाचवून दाखवायचे असे. एक तर नाट्य या शब्दाचा अर्थ नृत्य असा आहे. दुसरे म्हणजे अभिनय या शब्दाचा अर्थही नृत्य असाच आहे. आणि तिसरे म्हणज सर्व नाट्यशास्त्रभर अंगाभिनयाच्या रूपाने नृत्याचाच विचार केलेला आहे. हे नृत्यही स्त्रियांच्यासाठीच स्वाभाविक असते असा नाट्यशास्त्राचा मुद्दा आहे. संपूर्ण नाटक स्त्रियांनी नृत्याभिनित करायचे हा मुद्दा एकीकडे आणि संगीत प्राधान्य दुसरीकडे असे म्हटले की लय व ताल प्रधान होतात. वाद्यप्रयोगाला महत्त्व येते. म्हणून नाट्यशास्त्रात प्रत्येक पात्राचा एक विशिष्ट गतिप्रचार आहे, शिवाय

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २०३