पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषांना भृकंस म्हणत. त्यांचा उल्लेख पतंजलीपासून आहे. पण पुरुषांना नाट्य वर्ज्य नसले तरी या व्यवसायात तो गणिकासंघाचा व्यवसाय असल्यामुळे महत्त्व व प्राधान्य स्त्रियांना होते. नायिकेची कामे स्त्रिया करीत. नायकाची कामेही स्त्रियाच करीत. अमात्य, युवराज ही कामे प्रायः स्त्रिया करीत. सख्यांची कामे स्त्रियाच करीत. हे नाट्यव्यवसायातील स्त्रीप्राधान्य कोणत्याही शास्त्रविचारात आलेले नसून ते गणिकासंघाच्या व्यवसायाच्या वस्तुस्थितीतून आलेले आहे. नाटकात पुरुषांनीच स्त्रियांची कामे करावीत हा मराठी रंगभूमीवरील इ.स. १९३० पूर्वीचा मुद्दा आता रद्द झालेला आहे. शक्य तर सर्व कामे देखण्या तरुण स्त्रियांनीच करावीत हा नाट्यशास्त्रातील दंडकही आता कालबाह्य झालेला आहे.

गणिकासंघ
  गणिकासंघाचा व्यवसाय म्हणून प्राचीन भारतातील नाट्यव्यवसायाकडे आपण जेव्हा पाहतो त्या वेळी रसिक प्रेक्षकांच्यासाठी नाट्यास्वाद हा त्यांच्या कामपुरुषार्थाचा भाग आहे हे आपणास समजून घ्यावे लागते. प्राचीन भारतीय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुष मानीत असत. त्यांपैकी जे धर्मशास्त्रज्ञ आहेत त्यांचे म्हणणे असे होते की धर्मात अर्थ, कामाची व्यवस्था आहे आणि धर्मानुसार आचरण करणाऱ्यांना मोक्ष हे फळ आहे. जे अर्थशास्त्रज्ञ होते ते धर्म आणि काम अर्थमूलक समजत असून अर्थपुरुषार्थ धर्म, कामाची व्यवस्था लावतो असे समजत होते. जे कामशास्त्रज्ञ होते ते धर्म, अर्थाच्या अविरोधी राहून कामाची उपासना करावी असे समजत होते. नाट्यशास्त्र हा धर्म, अर्थाच्या अविरोधी कामपुरुषाचा भाग या संदर्भात विचारात घेण्याजोगा व्यवहार आहे म्हणून त्रिवर्ग प्रतिपत्तीची सोय या व्यवहारात लावलेली आहे. पुढे चालून मम्मट ज्या वेळी काव्याची प्रयोजने सांगतो त्यात, 'काव्यं यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये' इथपर्यंतचा भाग थोडक्यात सांगायचे तर धर्म, अर्थाची व्यवस्था सांगणारा आहे. कांतासंमित उपदेशाचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडलेला अर्थधर्मविरोधी कामसेवनाचा मुद्दा आहे. नाट्यशास्त्रीय विचारात नाट्यशास्त्राने औपचारिकरीत्या मोक्षाचा उल्लेख केलेला असला तरी नाट्यशास्त्रीय विवेचनात मोक्षपुरुषार्थाची संगती लागत नाही.

२०२ / रंगविमर्श / २०१