पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऋषी-मुनी रागावले, त्यांनी भरतपुत्रांना असा शाप दिला की, 'जा, मृत्युलोकी जाऊन तुम्ही शूद्र व्हा. यापुढे तुमचा व्यवसाय शूद्रांचा होईल.' या शापामुळे भरताचे पुत्र पृथ्वीवर आले. त्यांनी पृथ्वीवर नाट्य आणले. या पुत्रांनी पृथ्वीवर संतती निर्माण केली व शापमुक्त होऊन हे भरतपुत्र स्वर्गात निघून गेले. नाट्यव्यवसाय हा स्वर्गात भरतपुत्रांचा असला तरी या पृथ्वीतलावर तो शूद्रांचा व्यवसाय आहे.

शूद्र- गणिका व नाट्यकर्म
  पण शूद्र म्हटल्यामुळे सगळाच खुलासा होत नाही. शूद्रांच्यामध्ये अनेकजण आहेत. या शूद्रांच्यापैकी शरीरविक्रयावर चरितार्थ चालवणारा एक गणिकांचा वर्ग आहे. कौटिल्याने नाट्य हा गणिकांचा व्यवसाय असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. वात्सायनाने नटी, पात्र हे वेश्यांचे पर्यायवाचक शब्द असल्याचा उल्लेख केला आहे, नाट्यशास्त्राने नाट्य राजांच्या अंतःपुरात स्त्रियांच्याकडून विकसित होते हे सांगताना नाटकीया आणि नर्तकी गणिकांच्यामध्ये गृहित धरली आहे. प्राचीन भारतात आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या नृत्य, गीत, नाट्य या कलांचा अभ्यास करणाऱ्या, पण सामाजिक दर्जा शूद्रांचा असणाऱ्या गणिकांचा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय गणिकांचा असल्यामुळेच स्मृतिकार नाट्याचा विचार कामवासनेतील सुखलालसेसह करतात. प्राचीन भारतातील वरिष्ठवर्गीय राजे आणि व्यापारी यांच्या सुखविलासाचा हा भाग आहे. नाट्य हे श्रीमंतांच्या सुखविलासाचा भाग असते. नटांचा दर्जा शूद्राचा असतो. तो व्यवसाय गणिकांचा आहे म्हणून नाट्यात स्त्रीप्राधान्य असले पाहिजे. हा सगळा प्राचीन नाट्यातील भाग आता आपण कालबाह्य मानला पाहिजे.

पुरुषांना वाव
  प्राचीन भारतीय नाटकांत कामे करण्यासाठी पुरुषांना मनाई नव्हती. गणिकांच्या संघात जे पुरुष असत त्यांना कलागुण नसले तर बहिणींची गिहाइके सांभाळणे हा एक व्यवसाय होता. कलागुण असले तर ते गायक, वादक होत; नट, नर्तकही होत. तेव्हा पुरुषांचा रंगभूमीवर वापर वर्ण्य नव्हता हे उघड आहे. प्रसंगी पुरुष स्त्रीभूमिकाही करीत. अशा स्त्रीभूमिका करणाऱ्या

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / २०१