पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथात अनेक प्रवाहांनी आणि परंपरांनी संग्रहित झालेले आहे. यापैकी पुराणप्रवाहाने संकलित होणारी माहिती हा एक भाग आहे. या माहितीत शंकराने नृत्य निर्माण केले, विष्णूने वृत्ती निर्माण केल्या, ब्रह्मदेवाने ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून संगीत व अथर्ववेदातून रस घेऊन नाट्यवेद निर्माण केला, असल्या प्रकारची माहिती आहे. नाट्यशास्त्रात जी पौराणिक परंपरेची माहिती आलेली आहे ती प्रायः आमच्या पुराणवाङ्मयाला व स्मृतिकारांना अमान्य असणारी आहे. याला अपवाद आहेत पण ते अपवाद नियम सिद्ध करण्यापुरते आहेत. माहितीचा दुसरा प्रवाह कामशास्त्रातून येतो. तिसरा प्रवाह नृत्याच्या विविध परंपरांचा बनलेला आहे, चौथा प्रवाह काव्यशास्त्राचा आहे. अशी विविध प्रवाहांनी एकत्रित गोष्ट होणारी माहिती इ. सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात नाट्यशास्त्रात संगृहित झालेली आहे. संस्कृत नाट्यशास्त्राचा कालबाह्य झालेला भाग आणि संस्कत नाट्यशास्त्राने उपस्थित केलेले आजही महत्त्वाचे वाटणारे प्रश्न या दोन्हींना आधार याच भव्य संग्रह-ग्रंथांचा आहे.

नाट्यशास्त्र- गांधर्ववेदाचा एक भाग
  आपल्या परंपरागत पद्धतीप्रमाणे प्रत्येक वेदाला एक उपवेद असतो. या दृष्टीने पाहिले तर सामवेदाचा उपवेद गांधर्ववेद आहे. नाट्यशास्त्र हा गांधर्ववेदाचा एक भाग आहे, ही कल्पना जुनी आहे. कोणालाही शास्त्रग्रंथ स्वतःला एका उपवेदाचा एक भाग गृहित धरण्याऐवजी सर्व वेदांचा मुख्य गाभा असे आपले स्वरूप सांगणे पसंत करील, तसे ते नाट्यशास्त्राने सांगितले आहे.
  स्मृतिग्रंथांनी नाट्याचा उल्लेख कामवासनेतून निर्माण होणाऱ्या दहा दोषांच्या संदर्भात केला आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण असे आहे की प्राचीन भारतात व्यवसाय परंपरेने ठरलेले होते. नाट्य हा ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्यांचा व्यवसाय असू शकत नव्हता. हा व्यवसाय फक्त शूद्रांचा असू शकत होता. कौटिल्याने नाट्यकर्म हे शूद्रांचे मानलेले आहे. नाट्यशास्त्राने सुद्धा आडवळणाने ते शूद्रांचे कर्म आहे हेच सांगितलेले आहे. नाट्यशास्त्रातील भूमिका अशी आहे की भरतपुत्रांनी एक हास्यप्रधान नाटक लिहिलेले होते, या नाटकात ऋषी-मुनींची चेष्टा होती. नाटकाचे हे स्वरूप पाहून स्वर्गातील थोर

२०० / रंगविमर्श / १९९