पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तर मग संस्कृत नाट्यशास्त्राचा विचार करण्यासाठी आपल्यासमोर कोणते वाङ्मय उपलब्ध आहे. भरतनाट्यशास्त्राचे अभिनवगुप्तापूर्वीचे टीकाकार किंवा स्वतंत्र ग्रंथ लिहून नाट्याचा विचार करणारे लेखक आपणासमोर फक्त नामरूपाने शिल्लक आहेत. मातृगुप्त, कीर्तीधर, कोहल, हर्षवार्तिक, लोल्लटाचा 'रसविवरण' हा भाष्यग्रंथ, उद्भट, शंकुक ही सगळी फक्त नावेच आता शिल्लक आहेत. 'अभिनवभारती'च्या शिवाय या मंडळींची मते समजून घेण्यासाठी त्यापूर्वीचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. हा सगळा नाट्यविचार उपनिषदातील रसोवैसः हे सूत्र रसविचारात प्रमाण मानले जाण्यापूर्वीचा आहे. नाही म्हणायला भिन्न परंपरेने येणारे अजून तीन आधार शिल्लक आहेत. यांपैकी सर्वांत जुना आधार विष्णुधर्मोत्तर पुराणातील नाट्य विवेचनाचा आहे. दुसरा आधार, अभिनयदर्पणाचा आहे आणि तिसरा आधार अग्निपुराणाचा आहे. पैकी अग्निपुराणात असलेले नाट्यविवेचन व काव्यविवेचन प्रथम आनंदवर्धनामुळे व नंतर भोजामुळे प्रभावित झालेले आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण आणि अभिनयदर्पण' तपशिलावर काही निराळी माहिती नोंदविणारे ग्रंथ आहेत, पण वैचारिक दृष्टीने ही ठिकाणे नाट्यशास्त्रात भर घालणारी नाहीत. ज्या भूमिका डोळ्यासमोर ठेवून संस्कृतमधील नाट्यवाङ्मय निर्माण झाले त्यांचा शोध घेण्यासाठी आपल्याजवळ एकमेव आधार फक्त भरतनाट्यशास्त्र आहे असा याचा अर्थ आहे. कालिदासाच्यापूर्वी आणि भासाच्या नंतर केव्हातरी इ. सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात हा त्या वेळी प्रचलित असणाऱ्या विचारांचा एकत्रित झालेला असा संग्रह आहे.

भरतनाट्यशास्त्र-वेगवेगळे प्रवाह
  भरतनाट्यशास्त्र हा कुण्या भरत नावाच्या माणसाचा ग्रंथ नाही. प्रत्यक्ष नाट्यशास्त्र या ग्रंथाचीच भूमिका अशी आहे की भरतमुनी स्वर्गात राहत असत. ते स्वर्गातील देवांची नाटके बसविणारे होते. या पृथ्वीतलावर फक्त भरताचे पुत्र आले. स्वतः मुनी भरत कधी आलेच नाहीत. तेव्हा भरत ही सांस्कृतिक कल्पना आहे हे उघड आहे. या ऋषी-भरत संवादाच्या निमित्ताने छत्तीस अध्याय नाट्यविषयक विविध प्रकारची माहिती एकत्र गोळा करण्यात आलेली आहे. तीन-चारशे वर्षांच्या कालखंडात निर्माण झालेले बहुविध प्रकारचे चिंतन या

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / १९९