पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खरे तर असे आहे की अभिनवगुप्त रस हा शब्द उपनिषदांतून आलेला परब्रह्माचा पर्याय समजतात. हे परब्रह्मच आत्मा म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. हा आत्मा आनंदमय आहे. त्याच्यावरची मोहाची आवरणे संपली की तो आपल्या मूळच्या रूपात अभिव्यक्त होतो. आनंद हे जे आत्म्याचे स्वस्वरूप त्याच्या अभिव्यक्तीला अभिनवगुप्त रस मानतात. या आत्म्याच्या ठिकाणी सर्व जाणिवा केंद्रित होणे हाच ब्रह्मानंद आहे. ललित वाङ्मयातून निर्माण होणारा आनंद आणि धर्माला प्रमाण असणारा आध्यात्मिक अनुभव त्यांनी एकत्र आणला. हा एकत्र आणल्याबरोबर ललित वाङ्मयाचे सर्वांत मोठे प्रयोजन लौकिक जगाच्या बंधनापासून माणसाला मोकळे करणे व मोक्षोपयोगी आध्यात्मिक अनुभव सुलभतेने उपलब्ध करून देणे हे ठरले. एकदा ही भूमिका घेतल्यानंतर धार्मिक कथा हा काव्याचा सर्वांत महत्त्वाचा विषय ईशचिंतन हे वाङ्मयाचे सर्वांत महत्त्वाचे कार्य आणि मोक्षाचे साधन हे वाङ्मय व्यवहाराचे मूलगामी स्वरूप ठरणे भागच होते. एक वाङ्मयीन भूमिका म्हणून या भूमिकेचे महत्त्व काय, हा प्रश्न जरी आपण बाजूला ठेवला तरी एक गोष्ट उघड आहे की संस्कृत नाटककारांनी आपली नाटके मोक्षमार्गावरचे सहकारी म्हणून लिहिलेली नव्हती. त्यांच्यासमोर उपनिषदात ज्याला रस म्हणतात तो आत्माही नव्हता. त्या आत्म्याच्या दर्शनासाठी हे नाटककार आसुसलेलेही नव्हते. जे स्वरूप आणि प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून संस्कृत नाट्यसृष्टी उदयाला आलेली नाही, ज्या भूमिका नाटककारांच्या समोर नव्हत्या, ज्या भूमिका आस्वाद घेणाऱ्यांना गृहीत नव्हत्या त्या त्यांच्यावर लादण्यात अर्थ नाही.

अप्रस्तुत लेखक
  म्हणून संस्कृत नाट्यशास्त्राचा विचार करायचा असेल तर भट्टनायक, धनंजय, अभिनवगुप्त, मम्मट, विश्वनाथ इत्यादी विचारवंत या नाट्यशास्त्राच्या संदर्भात संपूर्णपणे अप्रस्तुत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मला अतिशय साधार अशी भीती वाटते की हीच मंडळी आधारासाठी घेऊन याही व्याख्यानमालेत संस्कृत नाट्यशास्त्राचा विचार होईल. हे घडणे अपरिहार्यच आहे. कारण विकासाचा क्रम नजरेआड झालेली मंडळी जे अभिनवगुप्त म्हणतो - ते कालिदासाला गृहितच होते असे समजण्याचा प्रयत्न करणार.

१९८ / रंगविमर्श