पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्कृतमधील श्रेष्ठ नाट्यविशारदांच्या यादीत घेता येणार नाही.
  संस्कृत नाट्यशास्त्राचा विचार करताना पहिली अडचण या ठिकाणी निर्माण होते. संस्कृतमधील श्रेष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत अभिनवगुप्त हा राजशेखरच्याही नंतरचा आहे आणि ध्वनिसिद्धांतांचा प्रतिपादक आनंदवर्धन हा एका राजशेखरला सोडल्यास इतर सर्व महनीयांच्या नंतरचा आहे. भट्टनायक आणि त्याची परंपरा अनुसरणारे धनंजय, धनिक हे लेखक किंवा अभिनवगुप्त आणि त्याची परंपरा अनुसरणारे मम्मट, विश्वनाथ हे लेखक हे असे लेखक आहेत, जे संस्कृतवाङ्मयाचा बहरकाळ संपून गेल्यानंतर उदयाला येतात. संस्कृत नाट्यवाङ्मयाचा सिद्धांतपक्ष म्हणून नेहमी अभिनवगुप्त पाहिला जातो. हा असा सिद्धांतपक्ष आहे, जो वाङ्मय जन्माला आल्यानंतर समोर येतो. अभिनवगुप्ताला संस्कृत नाट्यशास्त्राच्या संदर्भात एक विशेष महत्त्व आहे. इ. सनाच्या अकराव्या शतकापासून अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत सुमारे आठशे वर्षे जे प्रचंड काव्यवाङ्मय सर्व देशी भाषांमधून जन्माला आले त्यावर प्रभाव टाकणारा सर्वांत मोठा लेखक अभिनवगुप्त आहे. अभिनवगुप्ताने वाङ्मयाकडे पाहण्याची जी दृष्टी निर्माण केली, तिचा आधार घेऊन आठशे वर्षे प्रतिभेची स्फुरणे भारतात होत आली आणि ही सात-आठशे वर्षे प्राचीनांचे सर्व वाङ्मय या नव्या दृष्टिकोणातून अभ्यासिले गेले. इ. सनाच्या अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत जे अभ्यासक निर्माण झाले त्यांनी प्राचीनांचे वाङ्मय पाहिले कसे हा प्रश्न जर विचारला तर त्याचे सर्वांत महत्त्वाचे उत्तर हे आहे की या कालखंडात निर्मितीचा पथदर्शक आणि आस्वादाचा पथदर्शक प्रामुख्याने अभिनवगुप्त होता. उरलेली मंडळी स्थूलमानाने अभिनवगुप्ताच्या प्रभावाने प्रभावित झालेली आहेत. या प्रभावातून जैन ग्रंथकार गुणचंद्र, रामचंद्रही सुटलेले नाहीत.

अभिनवगुप्ताची रसप्रधान दृष्टी
  ही अभिनवगुप्ताची दृष्टी संपूर्णपणे रसप्रधान अशी आहे. ते रसातून वाङ्मयाची निर्मिती गृहित धरतात आणि वाङ्मयाचे फलही रसास्वादच मानतात. कवी आणि सहृदय यांचा प्रत्यय एकसारखा असतो या भूमिकेचा हा अर्थ आहे. हा रस अभिनव गुप्तांच्यासाठी ब्रह्मास्वादाला सजातीय असा आहे.

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / १९७