पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या आधी ग्रीक नाटके
  ग्रीक नाटकाचा ज्ञात आरंभ असचिलस, भारतीय अभिजात नाटकाच्या ज्ञात आरंभापेक्षा म्हणजे अश्वघोषापेक्षा काही शतकांनी जुना आहे. हे शतकांचे अंतर ग्रीक नाट्याचा वैभवकाळ सोफोक्लीस आणि भारतीय नाट्याचा वैभवकाळ शूद्रक, कालिदास यांच्यातही आहे. भरतमुनीच्या नावे असणारा 'नाट्यशास्त्र' नावाचा संग्रह-ग्रंथ आणि अॅरिस्टॉटलचे 'काव्यशास्त्र' यातही आहे. ग्रीकांचे हे कालदृष्ट्या असणारे जुनेपण मान्य करणे म्हणजे संस्कृत नाटकावर ग्रीक नाटकाचा परिणाम मान्य करणे नव्हे. नाट्याच्या क्षेत्रात ग्रीक हे पहिले नव्हेत. त्यांच्यापूर्वी कैक शतके इजिप्तची प्रसिद्ध रंगभूमी आहे. आपल्याला ज्ञात असणारा पहिला नाटककार इ-खेर-नफर्त हा असून तो इजिप्तमध्ये इ. स. पूर्वी एकोणविसाव्या शतकात होऊन गेला. भारतीय नाटक कालदृष्ट्या फार जुने नव्हे हे यासाठी समजून घ्यायचे असते की काळाचे जुनेपण हाच एक श्रेष्ठतेचा निकष मानण्याची आपल्याकडे प्रवृत्ती आहे.

अश्वघोष
  अश्वघोषाचा काळ स्थूलमानाने इ. स. पूर्वी पहिले शतक मानता येईल. त्याच्या नाटकाचे जे अवशेष शिल्लक आहेत ते पाहिले तर इतिवृत्त म्हणजे कथानक, पाठ्य, नाट्यतंत्र याचा फार मोठा विकास त्याच्यापूर्वी होऊन गेलेला होता असा निर्णय घ्यावा लागतो. अश्वघोषाच्या मानाने भास सुदैवी आहे. अजून त्याच्या नाटकावरचे वाद संपलेले नसले तरी निदान ‘स्वप्नवासवदत्ता' हे नाटक त्याचेच आहे हे सर्वमान्य आहे. भासापासून संस्कृत रंगभूमीचा काळ सुरू होतो. क्रमाने शूद्रक, कालिदास, विशाखदत्त आणि भवभूती हे या वैभवकाळाचे ज्येष्ठ प्रतिनिधी मानता येतील. इ. सनाच्या दुसऱ्या शतकापासून इ. सनाच्या आठव्या शतकाच्या शेवटापर्यंत अशी ही सहाशे वर्षे संस्कृत नाट्य-वाङ्मयाच्या वैभवाची वर्षे आहेत. हाच कालखंड संस्कृत काव्य-वाङ्मयाच्याही वैभवाचा आहे. अभिजात काव्य, नाटकाचे सुवर्णयुग म्हणून या कालखंडाचा विचार करावा लागेल. या काळाच्यानंतर उदयाला येणारा शेवटचा महत्त्वाचा नाटककार राजशेखर आहे. नाट्य म्हणून राजशेखरच्या नाटकाचे मोल काय ठरवावे, या प्रश्नाचे उत्तर जवळपास विवाद्य आहे, असे म्हणावे लागेल. कधीही राजशेखर

१९६ / रंगविमर्श