पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न नव्हते. अ‍ॅरिस्टॉटलविषयी असे म्हटले जाते की तो जी उत्तरे देतो त्यात त्याचे मोठेपण नाही. जे प्रश्न तो उपस्थित करतो त्यात त्याचे मोठेपण आहे. मी अतिशय नम्रपणे नेमका हाच मुद्दा संस्कृत नाट्यशास्त्राविषयी उपस्थित करू इच्छितो. खरोखरी या नाट्यशास्त्राने आपणासमोर उभे केलेले महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत?

त्रेतायुगाच्या आरंभी नाटकाचा उदय
  हा विचार करणे जितके वाटते तितके सोपे नाही. प्राचीन संस्कृतीविषयीच्या मिथ्या आदरभावनेमुळे विवेचकांच्या मनात काही चुकीचे ग्रह बलवान झालेले आहेत. त्यांच्याविषयी थोडेसे स्पष्टीकरण केल्याशिवाय संस्कृत नाट्यशास्त्र कोणते प्रश्न उपस्थित करते या मुद्दयाकडे सरळ जाताच येणार नाही. प्राचीन भारतात नाट्य किती जुने आहे, या प्रश्नाचे उत्तर आपण काय देणार? भरत नाट्यशास्त्रातील भूमिका आपण पाहिली तर ती असे सांगणारी आहे की, भारतात नाटकाचा उदय त्रेतायुगाच्या आरंभी होतो. सत्ययुग संपले, त्रेतायुगाला आरंभ झाला. काम, क्रोध परायण झाले. ईर्षा, मोह संमूढ झाले हे पाहून देवांनी ब्रह्मदेवाला विनंती केली आणि मग ब्रह्मदेवाने नाट्यवेद निर्माण केला. इतिहास म्हणून या कहाणीकडे पाहता येणार नाही. आपण फार तर असे म्हणू की जगातील सर्व आदिवासी टोळ्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नाट्य अस्तित्वात आहेच. या नाट्याचे स्वरूप लिखित नाटक, त्याची सुरचित मांडणी, या नाटकाचा प्रयोग असे असणार नाही, पण एका ओबडधोबड स्वरूपात सर्व आदिवासी जमातीत नाट्य असतेच. भारतातील माणसे याला अपवाद मानण्याचे कारण नाही. नाट्य या शब्दाने हे आदिनाट्य जर आपण गृहित धरणार असू तर मग त्याचा उदय भारतात शेती आणि स्थिर संस्कृती निर्माण होण्यापूर्वीचा, नगरांच्या उदयापूर्वीचा मानावा लागेल. या अर्थाने भारतीय नाटक हे अतिशय प्राचीन आहे, पण नाटक या शब्दाने जर आपण सुरचित नाटक, नाट्यकला गृहित धरणार असू, अभिजात नाट्याच्या उदयाचा काळ आपण नजरेसमोर ठेवणार असू तर अश्वघोषाच्या मागे आपल्याजवळ काही नाही. ग्रीकांचे अभिजात नाटक भारतीयांच्या अभिजात नाटकांपूर्वी उदयाला आले होते असा याचा अर्थ आहे.

संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / १९५