पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विरुद्ध असणारा दुसरा गट आत्मग्लानीने पछाडलेला असतो. भारताचा पुराव्याने मांडता येणारा आणि सर्व प्रकारची समृद्धी असणारा भूतकाळ या दुसऱ्या गटातील मंडळींच्यासाठी तुच्छ असतो. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा आपला सांस्कृतिक वारसा शून्य समजून पळत्या वर्तमानातील निसटत्या क्षणांना फक्त सत्य समजण्याची या मंडळींची प्रथा असते. स्वतःचा सगळाच भूतकाळ गमावून बसलेली ही माणसे वर्तमानकालीन जगात जे मान्य ठरलेले आहे त्याचे अनुकरण करण्यासाठी धडपडत असतात. या अनुकरणातून स्वतःच्या मनातील निर्माण झालेल्या पोकळीला काही दिशा मिळण्याचा संभव फारच कमी. कणा नसलेली, आकार घेण्यास अक्षय ठरलेली ही वृत्ती सतत कुणाचे तरी अनुकरण करून इतर कुणाच्यासारखे होण्याचा प्रयत्न करीत असते. कोणत्याही परतंत्र देशात या दोन भिन्न मनोवृत्तींचे ताण जाणवत असतातच. अशा या वातावरणात आपल्या मागच्या भव्य वारशाविषयी चिकित्सायुक्त आदरभाव बाळगणारे व जगात जे नव्याने अस्तित्वात आले त्याचे मर्म शोधून स्वीकार करणारे काहीजण असतात. नाट्याच्या क्षेत्रात ही समतोल, विधायक, चिकित्सक वारसा जपणारी पण नव्या ज्ञानाने विकसित होण्याची क्षमता असणारी दृष्टी कै. अण्णासाहेब कारखानीसांची होती. कारखानीसांनी जे लिहिले त्यापेक्षा त्यांनी ही जी दृष्टी ठेवली तिचे महत्त्व मला जास्त वाटते.

संस्कृत नाट्यशास्त्र-अनुत्तरित प्रश्न
  या संदर्भातच आजच्या परिसंवादाचा आरंभ होत आहे. या परिसंवादाचा विषय 'आजची मराठी रंगभूमी' हा नसून आजच्या रंगभूमीच्या संदर्भात संस्कृत नाट्यशास्त्र हा आहे. इतर वक्ते या बाबतीत कोणती भूमिका घेतील याची नक्की जाणीव मला नाही, पण माझ्यापुरते मी विषयाचे क्षेत्र निश्चित केलेले आहे. मी संस्कृत नाट्य-शास्त्राच्याविषयी बोलणार नसून आजच्याही मराठी रंगभूमीसमोर विचार करण्यासाठी शिल्लक असणारे जे प्रश्न त्या नाट्यशास्त्रात निर्माण झालेले आहेत त्यांच्याविषयी बोलणार आहे. संस्कृत नाट्यशास्त्राचा एक भाग संपूर्णपणे कालबाह्य झालेला आहे. हा कालबाह्य झालेला भाग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो, पण भाग म्हणजे त्या प्राचीनांनी विचारलेले आणि आजही विचारासाठी शिल्लक असणारे अनुत्तरित

१९४ / रंगविमर्श